मुंबई । ठाकरे सरकारनं राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या डिसेंबर २०२० पर्यंत राज्य पोलीस दलांमध्ये विविध पदांवर १२ हजार ५३८ कर्मचाऱ्यांची तातडीने भरती केली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरवर दिली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात शुक्रवारी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासह घेतलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत या वर्षअखेरपर्यंत पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत गृह विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, वित्त विभाग प्रधान सचिव नितीन गद्रे,पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास १२,५३८ पदांची भरती तातडीने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. डिसेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या बैठकीत गृह विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, (१/२) pic.twitter.com/ZBvz3FVqs4
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 17, 2020
राज्यात फेब्रुवारी २०१८ मध्ये पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये ३४०० जागांसाठी भरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती. मात्र भरती प्रक्रिया राबवली गेली नव्हती. मार्च महिन्यात करोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे सत्र सुरू ठेवल्यामुळे या भरतीचा निर्णय लांबणीवर पडत होता.