करिअरनामा ऑनलाईन | ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तरुणांना नोकरीच्या संधीच्या रुपात एक आगळी-वेगळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास ८५०० तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी आज दिले आहेत. पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे २००५ साली महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि सूत्राधारी कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यानंतर महापारेषण कंपनीत रिक्त पदांची सांख्य वाढत गेली आणि अपेक्षित भरतीदेखील करण्यात आली नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढल्याने ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात हजारो तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. महापारेषणमध्ये तांत्रिक श्रेणीतील पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील ६७५० पदे व अभियंता संवर्गातील १७६२ पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे.
डॉ. राऊत यांच्या सुचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी हा पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केल्यानंतर आज मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. यामुळे आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी तर उपलब्ध होणार आहेच पण अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीची संधी या भरतीद्वारे निर्माण होणार आहे.
यंत्रचालक व तंत्रज्ञ संवर्गाचे एकत्रीकरण करण्याचा निर्णयही डॉ. राऊत यांनी यावेळी घेतला आहे. यामुळे कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे. बदलत्या गरजेनुसार नवीन कौशल्य निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनेक वर्षे पदे रिक्त असल्याने पदोन्नतीमध्ये निर्माण झालेली कुंठित अवस्था या मेगा भरतीमुळे संपुष्टात येणार आहे. त्यामुळे महापारेषण कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.