करिअरनामा ऑनलाईन ।कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांनी अभ्यासक्रमात कपात केली आहे. यामुळे यंदा जेईई मेन्स परीक्षेच्या पद्धतीत बदल होण्याचे संकेत केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिले. अभ्यासक्रम कपात केली जाणार नसली, तरी विद्यार्थ्यांना ९० पैकी ७५ प्रश्न सोडवण्याचा पर्याय देण्याचा विचार सुरू असल्याचेही ते म्हणाले. करोना साथीच्या पार्शभूमीवर देशातील सर्व राज्यांनी दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमात १५ ते ३० टक्के कपात केली आहे. प्रत्येक राज्याची अभ्यासक्रम कपात वेगळी असल्यामुळे केंद्रीय प्रवेश परीक्षांना येणाऱ्या प्रश्नांची निवड कशी करायची, परीक्षा पद्धतीत काय बदल करता येतील, याबाबत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) विचार करीत आहे. याबाबत सातत्याने चर्चा सुरू असल्याचे पोखरियाल यांनी सांगितले.
नियमित शैक्षणिक वर्ष संपण्यासाठी अवघे तीन ते चार महिनेच उरलेले आहेत. अद्याप जेईई, नीट या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. याबाबत पालकांकडून सतत विचारणा होत होती. या पार्श्वभूमीवर त्यांचा हा संवाद महत्त्वाचा मानला जात होता. या संवादामध्ये त्यांनी नवीन शिक्षण धोरण; तसेच मोदी सरकारच्या शैक्षणिक धोरणांचाही आढावा घेतला. जेईई मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना एका वर्षात दोन संधी मिळतात. साधारणपणे जानेवारी आणि मार्चमध्ये ही परीक्षा घेण्यात येते. जेईई मुख्य परीक्षा चार वेळा घेण्याची सूचना विद्यार्थ्यांनी केली होती. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे अशी चार वेळा जेईई घेण्याच्या सूचनेवर विचार करण्यात येत आहे, असे पोखरीयाल यांनी सांगितले.
तीस टक्के भारांश कमी करण्यात आलेला असून अजून अभ्यासक्रम कमी होण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, विद्यार्थ्यांना ९० पैकी ७५ प्रश्न सोडवण्याचा पर्याय देण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचेही, पोखरीयाल यांनी सांगितले. प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करण्याची सूचनाही पालक आणि विद्यार्थ्यांनी केली. त्याबाबत ‘परीक्षेपूर्वी विद्यार्थी वर्गांमध्ये प्रात्यक्षिके करू शकले नाहीत, तर प्रात्यक्षिकांसाठी पर्याय शोधता येईल. परीक्षेच्या वेळापत्रकाबरोबरच प्रात्यक्षिक परीक्षांबाबत काय करावे, यावर सध्या चर्चा सुरू आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com