करिअरनामा ऑनलाईन । देशातील सर्व आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स परीक्षा आता वर्षातून चार वेळा आयोजित केली जाणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची ही परीक्षा देण्याची संधी एकदा हुकली तरी त्यांना पुन्हा तीन वेळा ही संधी मिळणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून विद्यार्थ्यांशी संवाद साधत ही घोषणा केली.
JEE Main परीक्षेचे पहिले सत्र फेब्रुवारी महिन्यात, दुसरे सत्र मार्च, तिसरे एप्रिल आणि चौथे सत्र मे महिन्यात होईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत ही परीक्षा होईल. फेब्रुवारीत होणारी परीक्षा २३ ते २६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत होणार आहे, अशी माहिती डॉ. पोखरियाल यांनी दिली.
ज्या पद्धतीने जॉइंट एन्ट्रन्स परीक्षेचे आयोजन होत आहे, ते पाहता ही जगातली सर्वात मोठी परीक्षा व्हावी अशी अपेक्षा पोखरियाल यांनी व्यक्त केली.
पॅटर्नमध्ये बदल
विविध राज्यांनी बारावी बोर्ड परीक्षांच्या अभ्यासक्रम कपातीबाबत वेगवेगळे निर्णय घेतले होते. त्यामुळे या सामायिक परीक्षेत नेमके कोणत्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता होती. तीही दूर करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेत एकूण ९० प्रश्न विचारले जातील, त्यापैकी ७५ प्रश्नांचीच उत्तरे विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. त्यामुळे या ९० प्रश्नांमध्ये सर्व प्रकारचा अभ्यासक्रम कव्हर केला जाणार आहे. शिवाय १५ वैकल्पिक प्रश्नांमध्ये नकारात्मक गुणही नसणार आहेत.
१३ भाषांमध्ये होणार परीक्षा
देशात पहिल्यांदाच जेईई मेन परीक्षा १३ भाषांमध्ये आयोजित केली जाणार आहे. इंग्रजीसह हिंदी, मराठी, बंगाली, आसामी, मल्याळम, गुजराती, कन्नड, उडिया, पंजाबी, तमीळ, तेलगु, उर्दू या भाषांचा समावेश करण्यात आला आहे.
मेरिट लिस्टसाठी सर्वोत्तम गुण ग्राह्य
चारही परीक्षा जर विद्यार्थ्याने दिल्या तर त्यापैकी बेस्ट स्कोर ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुण वाढवण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची संधीही यामुळे मिळणार आहे. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com