संघर्षाला साथ जिद्दीची | तिने तिच्या गावातील महिलांचं आयुष्य अनुभवलं होतं. घरातील महिलांनाही चूल आणि मूल सांभाळावं लागल्याचा अनुभव तिच्यासाठी नवीन नव्हता. म्हणूनच तिनं ठरवलं की मोठं झाल्यावर फक्त गृहिणी बनून राहणार नाही.
ही कहाणी आहे दिल्लीमध्ये डीसीपी पदावर कार्यरत असणाऱ्या मोनिका भारद्वाज यांची. हरयाणा या ठिकाणाहून संघर्ष करत पुढे गेलेल्या अनेक महिलांची कथा आपण आतापर्यंत पाहिली आहे. कुस्ती, हॉकी, क्रिकेट या खेळांमध्ये या भागातील महिलांनी विशेष प्राविण्यही मिळवलं आहे. अशीच एक कहाणी आहे या भागातील पोलीस अधिकारी बनलेल्या मुलीची. माध्यमिक शिक्षण सापला या आपल्या गावी पूर्ण केल्यानंतर बाकी महाविद्यालयीन शिक्षण मोनिकाने रोहतकमधून पूर्ण केलं. यानंतर दिल्लीमधून तिने आपल्या पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. पदवीचं शिक्षण घेत असताना तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. शिक्षण व्यवस्थित पूर्ण झालं नाही तर लग्न ठरवायची घाई घरातल्यांना होतीच. त्यामुळे होईल तो त्रास सहन करत तिने आपला प्रवास सुरू ठेवला.
२००९ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होत मोनिका आयपीएस बनली. तिने ही परीक्षा पास केल्यानंतर ती एवढी मोठी अधिकारी बनली याची कल्पनाच तिच्या गावातील कुणाला नव्हती. मात्र ती या परीक्षेत यशस्वी झाली आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. आपल्या सेवेतील बहुतांश काळ मोनिकाने दिल्लीत व्यतीत केला आहे. लहानपणी आजी-आजोबांसोबत खेळत असतानाच आपण फक्त गृहिणी बनून आपलं आयुष्य खराब करणार नाही असं ठरवलं होतं हे मोनिका वारंवार सांगते.
मोनिका भारद्वाज यांच्या या प्रेरणादायी वाटचालीला करिअरनामा टीमकडून सलाम.
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल यांची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”