घरचं खाऊन कंटाळा आला की, अथवा एखाद्या विशिष्ट प्रसंगाला, हॉटेलमधले चमचमीत खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो. आपल्यामध्ये खवय्ये नावाची एक जात आहे, ती अशा अनेक ठिकाणी फिरून विविध ठिकाणच्या चवी घेऊन जिभेचे चोचले पुरवीत असते. काही वर्षांपासून जेव्हा लोकांच्या उत्पन्नाचा स्तर वाढला, लोकांची हॉटेलिंगची हौस वाढली, तसे हॉटेल या व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. स्पर्धा वाढली आणि यातून ‘हॉटेल मॅनेजमेंट’ या करिअरचा जन्म झाला.
हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग खरंतर अनुभवसिद्ध करिअर आहेत. यात तुमचं वेगळंपण सिद्ध करावं लागतं आणि त्यावर तुमचं यश अवलंबून आहे. बऱ्याच लोकांना चांगलं जेवण करून लोकांना खायला घालायला आवडतं. त्यामुळे खरंच जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटसंबंधित क्षेत्रात करिअर करायचे असेल तर त्याचा शास्त्रीय अभ्यास करणं गरजेचं आहे.
आपल्या देशात उत्पन्नाची वाढती पातळी पाहता, येथे हॉटेल या व्यवसायाला खूप संधी आहे. या क्षेत्रात साधा ढाबा उघडून पुढे स्वत:चे पंचतारांकित हॉटेल किंवा हॉटेलची चेन उघडल्याचीही अनेक उदाहरणं आहेत. यातून प्रेरणा घेऊन मराठी मुलांनी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात स्वयंरोजगारासाठी उतरण्यास हरकत नाही.
हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळविण्याकरिता दोन अभ्यासक्रम असतात.
१. बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी (चार वर्षे) : या अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनतर्फे होणारी कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट (सीमॅॅट) देणे आवश्यक असते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपही मिळते.
२. बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी (तीन वर्षे) : या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याकरिता कोणतीही प्रवेश परीक्षा देण्याची बंधने नाहीत. या अभ्यासक्रमात प्रत्यक्ष प्रवेश घेता येईल. याशिवाय, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये दीड वर्षाचा डिप्लोमा कोर्स करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
विद्या शाखा व अभ्यासक्रम
फ्रंट आॅफिस मॅनेजमेंट : या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये येणाºया पाहुण्यांचे प्रवेश होण्यापासून तर बाहेर जाईपर्यंत दिल्या जाणाºया सर्व सेवा शिकविल्या जातात. चेक-इन, चेक-आउट, रूम प्रोव्हायडिंग, बिलिंग या सर्व घटकांच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते.
हाउसकीपिंग : या अंतर्गत हॉटेल क्लीनिंग, हॉटेल मेंटनन्स याबद्दल शिकविले जाते; शिवाय ग्राहकांना लंच, डिनर व त्यांच्या इतर गरजा व सुविधा देण्याबाबत शिकवले जाते.
फूड अॅण्ड ब्रेवरेज प्रॉडक्शन : या विद्या शाखेत प्रथमत: बेसिक फूड आणि ड्रिंक्स बनविणे, नंतर कॉन्टिनेन्टल फूड आणि ड्रिंक्स बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या दोन विषयांचे प्रशिक्षण दिल्यानंतर क्वांटिटी फूड बनविणे शिकविले जाते. फूड अॅण्ड ब्रेवरेज सर्व्हिस : या अभ्यासक्रमात हॉटेलमधील ग्राहकांकडून फूड आणि ड्रिंक्स यांच्या आॅर्डर्स घेणे व सर्व्ह करण्याची योग्य पद्धत हे घटक त्यात येतात.