विशेष लेख । “जगामध्ये कोणतीही नैतिक मूल्ये केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत, तर त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे सामर्थ्याचे पाठबळ असणे आवश्यक असते”, असे एका तत्ववेत्याने फार पूर्वी म्हंटले होते . आज एका बलाढ्य वैचारिक सामर्थ्याची खरोखरच गरज भासत आहे, कारण जे विचार करताहेत त्यांच्या मात्र हत्या केल्या जात आहे.
एकीकडे न्यायालय अनेक प्रकारचे स्वातंत्र्य देत आहे, पण वैचारिक भूमिका मांडण्याच्या स्वातंत्र्यास मात्र समाजकंटक विरोध दर्शवित आहे. तेवढी आपण नावापुरती लोकशाहीची मूल्ये स्वीकारली , पण आचरणात आणली नाहीत . सध्याच्या आभासी जगातून बाहेर येण्यासाठी जगण्याला वास्तवतेची जोड द्यावी लागणार आहे. फेसबुक, व्हाट्सअप व अन्य सोशल माध्यमांच्या अतिरेकी वापरापासून बाहेर येणे व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा एकप्रकारचे सिमोल्लंघनच म्हणावे लागेल.
आज समाजात वैचारिक विषमता फार टोकाला भिडलेली दिसते. विचारवंतांचा दुष्काळ व अविचारी लोकांचा सुळसुळाट हेच या जगाचे खरे दुर्दैव झाले आहे. आज आपल्या देशात कोणाला उपचारासाठी ऑक्सिजन मिळत नाही म्हणून जीव सोडावा लागतो, तर काहीजण पशूला वाचवण्यासाठी जिवंत माणसांची हत्या करीत आहेत, तर कुठ मॉब लीचिंगचा प्रकार घडून माणसे दगावत आहेत. यामुळे स्वतःमधील चांगल्या गुणांचा (अंतर्भूत शस्त्रांचा) वापर करून स्वतःमधील दुर्गुणांना हरविता आले, तर स्वतःच स्वतःवर मिळविलेला हा विजय एकप्रकारे सीमोल्लंघनच असेल.
विजयादशमीला रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची प्रथा आहे, मात्र सद्यस्थिति बघता आपल्याला आपल्यामधील लपलेल्या रावणाचे (वाईट विचारांचे) दहन करावे लागणार आहे. आपण कोण आहोत? कशासाठी आलोय? आणि आयुष्याला आपण काय परत देणार? या प्रश्नांचा एकदा सारासार विचार केल्यास आपण नक्की खऱ्या वास्तव मानवी जीवनात पोहचू. यासाठी सर्वांच्या विचारांच्या सीमोल्लंघन व्हावे, हीच अपेक्षा करूयात .