करिअरनामा । राज्यात रविवारी जवळपास 3 लाख 43, हजार 364 विद्यार्थ्यांनी टीईटीची परीक्षा दिली. मात्र या परीक्षेत गंभीर चुका असल्याची बाब समोर आली आहे. यावर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेत योग्य जोड्या जुळवा, असा प्रश्न देण्यात आला होता. मात्र रकाण्यांमध्ये वेगळेच पर्याय देण्यात आले होते. तसेच वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती, असा प्रश्न विचारण्यात आला, मात्र वाक्याखाली अंडरलाईन करण्यात आलेलीच नव्हती.
याशिवाय परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत असे अनेक चुकीचे प्रश्न होते. या संपूर्ण प्रकरणातील धक्कादायक बाब अशी की, दोन्ही पेपरमध्ये शुद्धलेखनाच्या गंभीर चुका आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी वर्गात नाराजी पसरली आहे. विद्यार्थ्यांकडून आता या चुकीच्या प्रश्नांचे गुण आम्हाला मिळावेत, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान मागील वर्षी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेतही प्रश्नपत्रिकेत अशा चुका असल्याचं समोर आलं होतं. परंतु त्यावेळी विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले नव्हते. परंतु यावर्षी जर गुण देण्यात आले नाही, तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा शिक्षकभरती संघटनेनं दिला आहे. आत्तापर्यंत राज्यात 7 वेळा टीईटीची परीक्षा झालेली आहे. मात्र भरती प्रक्रिया अद्याप राबवण्यात आलेली नाही.
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.