करिअरनामा | मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत चणे-फुटाणे विकून शिक्षणासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या संतोष साबळे यास मदतीचा हात दिला आहे. अभ्यास चालू असताना प्रामाणिक प्रयत्न कर, तुला लागेल ती मदत केली जाईल असे सांगून उद्धव ठाकरेंनी यावेळी संतोषला दिलासा दिला. संतोष साबळे याचे स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न आहे.
हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो दिवसभर सायकलीवर चणे-फुटाणे विकण्याचं काम करतो. रात्रीच्या वेळेत जमेल तेवढा अभ्यास करून संतोष स्पर्धा परीक्षांना सामोरं जातो. संतोष मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचा विद्यार्थी असून त्याची अडचण समजून घेऊन त्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी सामाजिक न्याय विभागाला दिले आहेत.
मुंबईत अशा पद्धतीने शिकणारे संतोषसारखे अनेक विद्यार्थी आहेत. एवढंच काय संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवनाचा संघर्ष रेटत विद्यार्थी आपला अभ्यास पूर्ण करून अधिकारीपदाची स्वप्न पाहत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचं अनुकरण त्या त्या विभागातील लोकप्रतिनिधींकडूनही व्हावी अशी अपेक्षा नागरिक आणि विद्यार्थी नक्कीच करतील.