करिअरनामा । सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामधील भोगेवाडी गावातील पल्लवी काळे ही तरुणी नौदल परीक्षेत देशात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. पल्लवी काळेच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे सोलापूरकरांची मान गर्वाने उंचावली आहे. विशेष म्हणजे पल्लवी ही एका शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. पल्लवी ही भोगेवाडी गावातील व्यवसायाने शेतकरी असलेल्या सुनील काळे यांची कन्या आहे.
भोगेवाडीसारख्या खेडे गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पल्लवीची भारतीय नौदल कोस्ट गार्ड असिस्टंट कमांडन्ट पदासाठी निवड झाली या बातमीने पल्लीवीच्या आई-वडिलांचा तर आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पल्लीवीच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे तिचे विविध स्तरातून कौतूक होते आहे. भोगेवाडी गावातील अनेक तरुण भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत आहेत. त्यातच आता पल्लवीच्या रूपाने गावाला नौदलातील पहिली महिला अधिकारी मिळणार आहे.
पल्लवीने प्रचंड मेहनत करून केंद्रीय स्टाफ सिलेक्शनकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावला. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पल्लवीने हे यश पदरात पाडलं आहे. ‘प्रत्यकाने आई वडिलांच्या कष्टांची जाण बाळगून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ध्येय सत्यात उतरवण्यासाठी अभ्यासात सातत्य, सकारात्मक विचार आवश्यक असल्याची भावना पल्लवीने या यशानंतर बोलून दाखवली. एवढेच नाही तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या इतर तरुण-तरुणींसाठी पल्लीवीने एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.