अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी यादी जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी यादी शनिवारी (ता.5) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अर्ज केलेल्या एकुण 1 लाख 58 हजार 810 विद्यार्थ्यांपैकी 76 हजार 231 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत. तर तब्बल 70 हजार 802 जागा अद्यापही रिक्त राहिल्या आहेत. पहिल्या यादीच्या तुलनेत दुसऱ्या यादीत किंचित घसरण झाल्याने तिसऱ्या यादीत प्रवेश मिळविण्यासाठीही विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहण्यास मिळणार आहे.

दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये पहिल्या पसंतीक्रम दिलेले 20 हजार 371 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर दुसऱ्या पसंतीक्रम दिलेल्या 12 हजार 315 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. या दुसऱ्या गुणवत्ता यादीत चर्चगेट परिसरातील मुंबईतील एच.आर, के.सी.आणि रुईया महाविद्यालयांतील कला आणि वाणिज्य शाखेतील कटऑफ ही 95 टक्केहून अधिक वर पोहोचली आहे. विज्ञान शाखेतील प्रवेश मात्र 90 ते 95 टक्केच्या दरम्यान राहिले आहेत. माटुंगा येथील रूईया, डीजी रूपारेल महाविद्यालयात वाणिज्य आणि विज्ञान शाखेची कटऑफ ही 90 टक्केहून अधिक राहिली आहे. तर विले पार्ले येथील साठे महाविद्यालयात कला शाखेचे प्रवेश हे 85 टक्के आणि त्यादरम्यान तर वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेशाची टक्केवारी थोडी वधारली आहे.

या गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पहिल्या पसंतीक्रमानुसार निश्‍चित झालेले आहेत त्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. जर प्रवेश घेतला नाही तर त्यांना पुढील फेऱ्यांमधून वगळले जाईल आणि अखेरीस विशेष फेरीतच त्यांना अर्ज करता येणार आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com