लोणार सरोवर आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाणार; आदित्य ठाकरेंची घोषणा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

बुलडाणा | लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढलेली लोणार सरोवराची छायाचित्रे शेयर करत आदित्य यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मला सांगताना आनंद होत आहे की, लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. मी २००४ मध्ये हे सरोवर पहिल्यांदा पाहिले होते, सर्वांना आकर्षित करेल असे ते दृश्य होते. जैवविविधता, पर्यटनाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व आहे अशा आशयाचे ट्विट ठाकरे यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असलेले लोणार सरोवर राज्यातील सात आश्चर्यांपैकी मानले जाते. लोणार सरोवर नेमके वय किती, यावरून मतमतांतरे आहे. सरोवराचे वय मोजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या गेल्या आहेत. एक म्हणजे थर्मोलोमिनेसेन्स विश्लेषण पद्धत. यानुसार, लोणार सरोवर ५२ हजार वर्षे जुना आहे. परंतु, आजच्या काळात सर्वांत अचूक मानल्या जाणाऱ्या ऑर्गन डेटिंगनुसार, लोणार सरोवराची निर्मिती ही सुमारे ५ लाख ७० हजार वर्षांपूर्वी झाली असावी, असे सांगितले जाते. २०१० मध्ये यासंदर्भातील संशोधन करण्यात आले होते.