करिअरनामा ऑनलाईन । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेले काही महिने राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. नुकताच विद्यापीठ अनुदान आयोगाने १ नोव्हेंबर पासून महाविद्यालये सुरु करण्याचा आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनीही आता दिवाळीनंतर ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी कोरोना काळात घ्यावयाच्या सर्व नियम व अटींचे पालन करुनच हे वर्ग सुरु केले जातील असे सांगितले आहे.
राज्यातील संचारबंदी आता हळूहळू उठविण्यात आली असून, सर्व कामकाज हळूहळू सुरळीत केले जात आहे. जवळपास सर्वच गोष्टी आवश्यक नियमांसह सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र बालमंदिरे आणि विद्यामंदिरे तसेच माध्यमिक शाळा अद्याप सुरु करण्यात आलेल्या नाही आहेत. विद्यार्थ्यांचे या कालावधीत मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे ते म्हणाले. म्हणूनच या पार्श्वभूमीवर आता ९ वी पासून १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शाळा सुरु करत असताना आवश्यक ती सर्व काळजी घेण्यासाठी सरकारच्या वतीने एक धोरण आखण्यात येईल. या धोरणाच्या माध्यमातून कोणीही कोरोना बाधित होणार नाही तसेच विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळेल अशी सरकारची भूमिका आहे. असे राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. जर एखाद्या शिक्षकाचे वय ५० च्या पुढे असेल तर अशा शिक्षकाच्या जागी दुसऱ्या शिक्षकाला घेता येईल का सोबतच आजारी तसेच बाधित मुले शाळेत येवू नयेत यासाठी सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या चाचण्या करता येतील का, यावरही विचार सुरु असल्याचे ते म्हणाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’