यूजीसीनं सुरु केलं PhD, NET, SET उमेदवारांसाठी जॉब पोर्टल; मिळणार नोकरीसंबंधित उपडेट

करिअरनामा ऑनलाईन । PhD, NET, SET परीक्षा पात्र उमेदवारांना ‘नोकरी’साठी UGC ने एक चांगला निर्णय घेतला आहे. यूजीसीने खास या तरुणांसाठी एक नवीन शैक्षणिक जॉब पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून उमेदवारांना नोकरी संबंधात वेळोवेळी उपडेट मिळत राहतील. या पोर्टलवर उमेदवाराने आपले प्रोफाइल तयार करावे लागणार असून विविध महाविद्यालय आणि विद्यापीठातील रिक्त पदांचा तपशील आपल्याला सहजरित्या मिळू शकणार आहे. त्यामुळे उमेदवारांना दारोदारी भटकावे लागणार नाही. महाविद्यालय आणि विद्यापीठे उमेदवारांना त्यांची प्रोफाइल बघून बोलावू शकतात.

युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन म्हणजेच UGC ने एक परिपत्रक काढून या पोर्टलबद्दल सांगितले आहे. उमेदवाराने आपली प्रोफाइल या पोर्टलवर तयार करणे आवश्यक आहे. त्यानंतरच, उमेदवाराला या पोर्टलवर योग्य माहिती मिळू शकेल. या पोर्टलच्या माध्यमातून, शैक्षणिक संस्था उपलब्ध उमेदवारांचा शोध घेऊ शकतात आणि नोकरीच्या रिक्त जागा पाहून उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

या व्यतिरिक्त, उपलब्ध नोकऱ्यांमध्ये सुधारणा करणे, तसेच शैक्षणिक क्षेत्रात बदल करण्याचा आयोगाचा विचार आहे. अकाउंट्स, सिक्युरिटी, हेल्थ, लायब्ररी आणि इतर विभाग यांसारख्या नॉन टीचिंग जॉबमध्ये प्रशासकीय भूमिकेसह नोकर्‍या असतील. शिवाय या नोकर्‍यांची माहिती आता पोर्टलवर देखील अपलोड केली जाणार आहे.