राज्यातील शाळा सुरु करु शकू का हे माहीत नाही – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई | विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. राज्य सरकारकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती. मात्र राज्यातील शाळा सुरु करु शकू का हे माहीत नाही असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. आज ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारा नागरिकांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

अनावश्यक गर्दी टाळली गेली पाहिजे. नागरिकांनी असं समजू नये कि आता ऑफिस सुरु झालेत, सर्व गोष्टी सुरु झालेत म्हणजे कोरोना गेला आहे. आपण अद्याप शाळा सुरु करू शकलेलो नाही. निर्णय तर आपण घेतला आहे. परंतु अद्यापही आपण शाळा सुरु करू शकू का हे प्रश्नांकित आहे असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. कारण समजा शालेय शिक्षक आजारी पडले, विद्यार्थी आजारी पडले तर काय करायचे? या सर्व गोष्टींची काळजी घेत आपल्याला हळू हळू सर्व गोष्टी उघडायच्या आहेत असं ठाकरे यांनी म्हटले आहे.

मात्र, दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच, येत्या दोन महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंसह स्थानिक प्रशासनाने अधिक काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. त्यामुळे वाढत्या धोक्यात शाळा सुरु होणार का असा प्रश्न पुन्हा निर्माण झाल्याने संभ्रम वाढत आहे.