माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी..!! – निळू दामले

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । युनिक स्कुल ऑफ जर्नालिसमच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विशेष सत्रामध्ये ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पत्रकारितेत आवश्यक असणाऱ्या मूलभूत कौशल्यांविषयी त्यांनी आपलं अनुभवपर मनोगत व्यक्त केलं. त्यांच्या मनोगताचं हे मुक्त शब्दांकन..!!

नमस्कार दोस्तांनो, पत्रकारिता करायचं डोक्यात घेऊन इथपर्यंत आलात त्याचं कौतुक आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कामाच्या नवनवीन संधी तुम्हाला उपलब्ध होतील. तेव्हा मात्र तुम्हाला आवडतंय ते काम बिनधास्तपणे करताना तुम्ही मागे हटू नका. तुमच्यापैकी काहीजण डेस्कवर काम करतायत, काही फील्डवर आहेत. हे करताना बातमीदारी करु इच्छिणाऱ्या प्रत्येकाने जोजेफ मिशेलची सर्वच पुस्तकं आवर्जून वाचायला हवीत. सूक्ष्म निरीक्षणं कशी नोंदवावीत याचं उत्तम उदाहरण जोजेफ मिशेल आहे.

आता वळूया पत्रकारिता आणि आपलं जगणं याकडे.. तुम्ही कोणतंही काम करा, त्यातून तुमचा स्वतःचा विकास होतोय का हे पाहणं गरजेचं आहे. माणूस म्हणून समृद्ध होण्याची प्रक्रिया ही एका दिवसाची नाहीच मुळी..त्यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात, अनुभव घ्यावा लागतो, लोकांमध्ये मिसळावं लागतं. याबाबतीत माझ्यासमोर जी ४-५ नावं आहेत त्यांच्याविषयी तुम्ही नक्कीच माहिती मिळवली पाहिजे, वाचली पाहिजे आणि त्यावर विचारही केला पाहिजे.

माणूस मासिकाचे संपादक माजगावकर, ज्येष्ठ पत्रकार अनंत भालेराव, अशोक शहाणे, साहित्यिक आणि पत्रकार विजय तेंडुलकर ही ती नावं. या लोकांचं जगणंच भन्नाट होतं. वास्तवाला भिडणारं लिखाण त्यांनी सातत्याने केलं. माजगावकर हे शहरात राहणारे तर भालेरावांच जगणं पक्कं मराठवाडी. लोकं समजून घ्यायचा यांचा आवाका विलक्षण होता. कुठेही जा, लोकांशी बोला, भरपूर वाचा, जे समजतंय ते लिहून काढा, जे समजत नाही ते विचारा, समजत नाही तोपर्यंत विचारा याच प्रक्रियेतून यांची घडण झाली आहे. अशोक शहाणे हे आजही तितक्याच स्पष्टवक्तेपणाने आपलं म्हणणं मांडतात. त्यांची दृष्टी इतकी व्यापक आहे की त्यांना एखाद्याचा राग आला तरी समोरच्या व्यक्तीला तो राग काहीतरी शिकण्याच्या उद्देशाने बोललं असल्याची जाणीव होते. विजय तेंडुलकर यांचं जगणंच अफलातून म्हणावं लागेल. माणूस बोलत असताना फक्त हा, ठीक आहे, अच्छा, बरं असं म्हणत त्याच्याशी संवादी राहायचं पण त्यासोबतच त्या व्यक्तीचं आकलनही तितक्याच ताकदीने करण्यात तेंडुलकर माहीर होते. साहित्यिक होण्याआधीही तेंडुलकर पत्रकार होते, त्यामुळं त्यांनी अनुभवलेल्या बारीकसारीक अनुभवांवर आधारीत लिहलेली रामप्रहर, हे सर्व येतं कोठून? ही पुस्तकं आवर्जून वाचलीच पाहिजेत.

आता यांच्याविषयी बोलून झालं, आपल्या जगण्यात आपण काय करु शकतो याकडे जरा लक्ष देऊ. वास्तवाच्या पलीकडच्या गप्पा मारणाऱ्या लोकांपासून दूर राहायला शिकलं पाहिजे. म्हणजे कसं, तर सज्जन राहिलं पाहिजे, चिडचिड नाही केली पाहिजे, तोलून मापून बोललं पाहिजे, आदर्शवादी जगलं पाहिजे, दारु नाही पिली पाहिजे वगैरे वगैरे..गप्पा मारणारे लोक त्यांच्या त्यांच्या कंपूत राहत असतात. त्यापलीकडे बघण्याची त्यांना गरज वाटत नाही, किंबहुना त्यांच्या अपेक्षांपेक्षा एखादा वेगळा वागला तर ते त्याला वाळीत टाकायलाही कमी करत नाहीत. त्यामुळं वास्तवात काय घडतंय हे स्वतःच्या बुद्धीला पटतंय का बघून गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा.

स्वतःला याबाबतीत गाढव म्हटलात तरी हरकत नाही. जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण गाढवच आहोत असं समजून ती गोष्ट मुळापासून समजण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण अतिशहाणं बनून लोकांना काही सांगायला गेलं की लोक आपल्यापासून दुरावतात. त्यापेक्षा ‘मला हे समजून सांगता का?’ म्हणत आपण शहाणं नाही हे दाखवूनच लोकांशी कनेक्ट वाढवता येतो. शिवाय आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या विषयी माहिती मिळाली की कोण खरं आणि कोण खोटं बोलतंय याचाही उलगडा होतो.

हे पण वाचा -
1 of 332

आता थोडं बोलूया ज्ञानाबाबत. मी स्वतः ज्ञान मिळवण्यासाठी माझ्या आयुष्यातील ५० वर्षांपेक्षा जास्त काळ या धंद्यात घातला आहे. जे मला समजत नव्हतं ते मी दिवस दिवस घालवून समजून घेतलं आहे. शेतीतज्ञ श्री.अ. दाभोलकर यांच्यासोबत काम करताना शेतीतील बारकावे मी पाहिलेत, सेंद्रिय शेती काय असते ते समजून घेतलंय. सुरुवातीला तो माझ्या आवडीचा विषय नसेलही, मात्र स्वतःला व्यापक करण्यासाठी ते गरजेचं असल्यामुळेच मी ते त्यांच्यासोबत राहून शिकून घेतलं. यातून मलाही समजलं की ज्ञान मिळवण्याचा एक विशिष्ट आराखडा आहे, त्याची पद्धत मात्र प्रत्येकजण वेगवेगळी अवलंबत असतो. माझ्या दृष्टीने ज्ञान मिळवण्यासाठीचे दोन मुख्य मार्ग आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष फील्डवर उतरुन गोष्टी समजून घेणं आणि दुसरं म्हणजे वाचन.

फील्डवर तुम्ही असता तेव्हा तुमची सगळी इंद्रियं आणि मेंदू काम करत असतो. तुम्हाला काहीतरी शोधायचं असतं आणि त्यावेळी मेंदू रिकामा ठेवून चालणारच नसतं. वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात, वेगवेगळी मतं समजतात, स्वतःला नवीन घडामोडी समजतात. हे करत असताना तुम्हाला तुमचा अहंकारही बाजूलाच ठेवावा लागतो. कारण तसं नसेल तर मग तुम्हाला लोकांमध्ये मिसळता येत नाही आणि हवी ती माहिती मिळवण्यातही अडचणी येतात. दुसरं म्हणजे प्रचंड वाचन आणि त्याच्या जोडीला चित्रपट पाहणं. समाजातील सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला उपजत माहिती नसतात. हे प्रश्न समजण्यासाठी महत्वाचं आहे वाचन. अफाट वाचन. तुम्हाला जे जे जाणून घ्यायचंय त्या विषयातील भरपूर वाचन करणं गरजेचं आहे.

आजच्या पत्रकारिता सगळ्यांत बेजबाबदार पत्रकारिता आहे असं म्हणावं लागेल. याचं कारण ही पत्रकारिता सोशल मीडियावर जास्त आधारलेली आहे. आज माध्यमांवर जगणाऱ्या माणसांचं काही खरं नाही. कारण समाजमाध्यमांवर अभ्यास न करता आणि बेजबाबदारपणे लिहिता येतं. याचा जाब विचारला तर ट्रोलिंग आर्मीसुद्धा तयारच असते. माहितीचा अफाट साठा आपल्याजवळ असताना फॉरवर्डेड मेसेजमुळं आपण चांगल्या महितीपासून दूर तर पडत नाही ना हे तपासणं गरजेचं आहे. अत्यंत जबाबदारीपूर्वक मला हे सांगावं लागतंय की आजच्या संपादकांकडे व्यापक दृष्टीच उरली नाही. कारण पत्रकारांना काय हवंय ते देण्यापेक्षा लोकांमध्ये काय चालेल हेच सगळ्यांकडून पाहिलं जात आहे. अशाने अनेक महत्त्वाचे प्रश्न सर्रास दुर्लक्षिले जात आहेत.

आता एवढं सगळं मी बोलतोय खरं, पण भारतीय पत्रकारितेची ती संस्कृती आहे का? तर बिलकुल नाही. भारताने ध्येयवादी पत्रकारितेला प्राधान्य दिल्यामुळे ठराविक विचाराला बांधील पत्रकारच आपण तयार करु शकलो आहोत. कोणत्यातरी धर्माचा टिळा लावलेले, कोणत्यातरी पक्षाची टोपी घातलेले पत्रकार तयार होणं हे धोकादायक आहे. तुम्हाला ‘जे आहे ते’ सांगता येतंय का? आणि त्याचा शोध तुम्ही कशाप्रकारे घेताय याला आज जास्त महत्त्व आहे. दोन राष्ट्रांचे प्रमुख आज एकमेकांना भेटत आहेत. यात नरेंद्र मोदी यांच्याविषयी खरी माहिती भारतातील पत्रकारांना कधीच मिळत नाही. याऊलट डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रत्येक हालचालींवर अमेरिकेतील मीडियाचं बारीक लक्ष असतं. गांधीवादी, समाजवादी, आंबेडकरवादी ही स्वतःची प्रतिमा पत्रकारांनी तरी बनवू नये. आणि ध्येयवादी पत्रकारिता हा विचारही डोक्यातून काढला पाहिजे. कारण ध्येयाच्या आड येणाऱ्या सगळ्या गोष्टी चूकच असं मानलं की मग त्या पत्रकारितेलाही एकारलेपण येतं. व्यक्ती चुकत असेल तर तिला खडसावणे हा दोष नाही, आणि देशद्रोह तर मुळीच नाही. कारण एका व्यक्ती आणि पक्षापेक्षा देश हा नेहमीच मोठा आहे, असतो आणि राहील.

बाकी एखाद्या विषयाची निवड करुन त्याविषयी जमेल तितकी माहिती गोळा करुन नवीन काहीतरी शोधण्याचा आनंद वेगळाच आहे. मी गेली ५० वर्षं हा आनंद लुटत आलोय आणि जिवंत आहे तोपर्यंत लुटत राहीन. तुम्हालाही असंच करायचं असेल तर केव्हाही या, माझी सोबत आहेच.

नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: