साताऱ्यातील  शिक्षक बालाजी जाधव ठरले आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी

करिअरनामा ऑनलाईन । टाळेबंदीच्या काळात मुलांना शिक्षण देण्यासाठी अभिनव मार्ग शोधणारे बालाजी जाधव हे साताऱ्यातील  शिक्षक आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. जाधव यांनी टाळेबंदीच्या काळात शिक्षण सुरू ठेवण्यासाठी केलेल्या कॉन्फरन्स कॉलद्वारे शिक्षणाच्या प्रयोगाची दखल ‘हनी बी नेटवर्क’ व ‘गियान’ या संस्थांनी घेतली आहे. Balaji Jadhav

बालाजी जाधव हे विजयनगर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून त्यांनी करोना टाळेबंदीतही मुलांना शिक्षणापासून वंचित राहू दिले नाही. त्यांच्या शाळेत ४० विद्यार्थी शिकतात. आई-वडिलांकडे स्मार्टफोन नसल्याने जाधव यांनी दूरसंवादाच्या (कॉन्फरन्स कॉल) माध्यमातून एकावेळी दहा विद्यार्थी याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवले. मुलांना सहज आकलन होण्यासाठी गोष्टींचा वापर केला. मोठय़ा मुलांना रोज सांगितलेल्या गोष्टी लिहिण्यास सांगण्यात आले. त्यातून विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव झाला. जाधव यांनी आठ महिने हा उपक्रम राबवून सर्वच विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करून घेतला. एवढेच नव्हे, तर त्यांनी शेजारच्या शाळांतील विद्यार्थ्यांनाही मदत केली. या अभिनव कार्यासाठी त्यांना २४ डिसेंबरला एचबीएन क्रिएटीव्हिटी अँड एक्सलुजिव्ह अ‍ॅवॉर्डस पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्यासह देशभरातील आणखी दहा शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला. Balaji Jadhav

हनीबी नेटवर्क व गियान या दोन संस्थांनी शिक्षणातील प्रयोगशीलता, नवप्रवर्तन यासाठी हा पुरस्कार ठेवला होता त्यात पारंपरिक ज्ञान पद्धतीतील रोजचे अडथळे दूर करणाऱ्या शिक्षकांचा विचार करण्यात आला. एकूण ८७ देशांतून २५०० प्रवेशिका आल्या होत्या. त्यात नऊ देशांतील ११ जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.

बालाजी जाधव म्हणाले आतापर्यंत के लेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांची राज्य, राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली होती. मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान झाल्याचा आनंद आहे. या पुढील काळात आणखी शिक्षकांना अशा व्यासपीठांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जेणेकरून जगभरात होत असलेले नावीन्यपूर्ण शिक्षणाचे प्रयोग आपल्या शिक्षकांपर्यंत पोहोचतील आणि शिक्षकांच्या माध्यमातून ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com