Success Story: सौर ऊर्जेच्या दिव्यावर केला अभ्यास; राज्यात 3 रा क्रमांक मिळवून झाला अधिकारी!

करिअरनामा ऑनलाईन। डहाणू तालुक्यातील आदिवासी गंजाड दाभेपाड्यात राहणाऱ्या संजय शिडवा वायडा (Success Story of Sanjay Wayada Class 2 Officer)  याने राज्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत अव्वल येण्याचा बहुमान पटकावला आहे. डहाणूसारख्या दुर्गम तालुक्यात शिक्षणाच्या पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने स्वतःला सिद्ध केलंय. आदिवासी पाड्यातील संजयने संपूर्ण राज्यात 3 रा क्रमांक पटकावून वर्ग-2 च्या अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. अर्थात त्यांच्या या संघर्षमय प्रवासात त्याच्या आई वडिलांचा वाटा मोठा आहे.

सौर ऊर्जेच्या दिव्यावर केला अभ्यास – गंजाड दाभेपाडा हा डहाणू तालुक्यातील अति दुर्गम भाग. संजय हा इथला आदिवासी तरुण. या आदिवासी पाड्यात शिक्षणासाठी पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. संजयच्या घरात अठरा विश्व दारिद्रय. घरामध्ये लाईट देखील नाही. अशा परिस्थितीत संजयने सौर ऊर्जेच्या दिव्याच्या प्रकाशाखाली अभ्यास केला. शिक्षणाचा मागमूस नसलेल्या आदिवासी पाड्यातून अभ्यास करून परीक्षा पास होत संजयने इतिहास घडवला आहे.

आई – वडिलांच्या काष्टाचं चीज केलं- गरिबीचे चटके सोसणारे संजयचे आई – वडील कधीही परिस्थितीपुढे हतबल झाले नाहीत; तर त्यांनी मुलाला अधिकारी करण्यासाठी दिवस रात्र जिवाचं राण केलं. संजयचे वडील शेतकरी आहेत तर त्याची आई फुगा फॅक्टरीत मजुरी करते. त्यांनी स्वतःचे आयुष्य खर्ची घालून संजयला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. अभ्यासासाठी पैशाची गरज होती. पैसे जमवण्यासाठी संजयने एका कंपनीत वर्षभर दिवसाला सोळा – सोळा तास मजुरी केली. स्वतःची जिद्द पूर्ण करत संजयने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करून दाखवले.

संजयचा शैक्षणिक प्रवास – संजयने जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आश्रम शाळेतून माध्यमिक शिक्षण घेऊन पुढे पनवेल (जिल्हा – रायगड)च्या एम. जी. एम. अभियांत्रिकी कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्याच्या वाटेत अनेक खाच-खळगे येत होते. हे खाचखळगे टप्प्याटप्प्याने पार करत त्याने स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला. राज्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा पास होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न संजयने सत्यात उतरवले. घरची परिस्थिती एकदमच हलाखीची असल्यामुळे अभ्यासासाठी साहित्य खरेदी करण्याची संजयची कुवत नव्हती. या परिस्थितीवर मात करण्यासाठी संजयने बांबूच्या आधारावर स्टडी टेबल तयार केले. तारा आणून त्याने या टेबलावर प्रकाश व्यवस्था उभारली व एका दहा बाय पंधरा च्या खोलीत शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसून संजयने आपला अभ्यास पूर्ण करून जिद्द तडीस नेली आहे. त्याचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. (Success Story of Sanjay Wayada Class 2 Officer)

संजयच्या आयुष्यात मित्र व शिक्षकांचे योगदान – घरात अभ्यासासाठी पोषक वातावरण नसल्याने त्याने मार्गदर्शन केंद्र निवडण्यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. यावेळी विक्रमगडच्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची त्याला माहिती मिळाली. यादरम्यान त्याला अनेक शिक्षकांसह मदत करणारे मित्र मिळाले. यातूनच त्याचा आत्मविश्वास वाढला व खऱ्या अर्थाने तेथूनच त्याने आपल्या आयुष्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात यशोगाथा लिहिली.

“आता क्लास 1 अधिकारी होण्याची इच्छा” – जगाच्या पाठीवर कुठेही असो इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही करता येते हे संजयच्या प्रयत्नाने स्पष्ट झाले आहे. ”संपूर्ण कोकणात असे अनेक अधिकारी घडवून महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये आपले व कुटुंबाचे अधिकारी पाहायचे आहेत, अशी आशा आहे. आता क्लास 2 अधिकारी झालो असलो तरी पुढील परीक्षा देऊन क्लास 1 अधिकारी होण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. (Success Story of Sanjay Wayada Class 2 Officer) याचबरोबरीने मी राहत असलेल्या खेड्यात शिक्षणासाठी तरुणांना प्रोत्साहन देऊन माझ्यासारखे अधिकारी बनण्यासाठी त्यांना बळ देईन असे संजय म्हणतो.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com