Success Story : कौतुकास्पद!! हमालाच्या पोरीचा MPSC परीक्षेत डंका; ओबीसी महिलांमधून राज्यात अव्वल

करिअरनामा ऑनलाईन । ग्रामीण भागात अनेक कुटुंबाची सर्वसाधारण (Success Story) परिस्थिती बघायला मिळते. पण परिस्थिती बिकट असतानाही आपली चुणूक दाखवत कोल्हापूरच्या एका कन्येने MPSCमधून राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षेत ओबीसी महिलांमधून नुकताच संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशामुळे सध्या गावासह जिल्हाभरात तिचे कौतुक होत आहे.

कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात पुरेशा सोयीसुविधा नसलेलं जोगेवाडी हे गाव डोंगराळ भागात वसले आहे. या गावातील रेश्मा बाजीराव ऱ्हाटोळ या मुलीने आपल्या नावाचा ठसा स्पर्धा परीक्षेतून उमटवला आहे.

डोंगराळ भागात घेतले शिक्षण (Success Story)

रेश्माने जोगेवाडी गावातच तिचे १ ली ते ४ थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण घेतले. तर ५ वी ते १० वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण तळाशी येथील शाळेत तिने पूर्ण केले. त्यानंतर बिद्री येथे १२वी पर्यंत शिक्षण घेऊन तिने मॅकॅनिकल या ब्रांचमधील डिप्लोमाची पदवी पॉलिटेक्निक कॉलेज, कोल्हापूर येथे प्राप्त केली. तर डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तिने बी.ई. मेकॅनिकल ही इंजिनिअरिंगची पदवी घेतली. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच रेश्माने एमपीएससी परीक्षेत आपलं नाव कमविण्याची जिद्द धरली होती.

B.E. नंतर ध्यास MPSC चा

बी.ई. नंतर तिने एमपीएससी परीक्षेसाठी पूर्ण वेळ दिला होता. पण काही परीक्षांमध्ये तिला अगदी थोडे मार्क्स मिळाल्यामुळे अपयश आले होते. तरी देखील (Success Story) खचून न जाता तिने अभ्यास सुरू ठेवला. आणि त्यातूनच आता राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षेत तिला घवघवीत यश प्राप्त झाले आहे.

वडिलांनी शिक्षणासाठी सर्व काही पुरवलं

रेश्माचे वडील बाजीराव ऱ्हाटोळ हे भोगावती साखर कारखान्यात हमालीचे काम करतात. रेश्माला आणि तिच्या भावांना संपूर्ण शिक्षण पूर्ण करू देताना वडिलांनी खूप कष्ट घेतले आहेत. पैशाची कोणतीही कमतरता न जाणवू देता त्यांनी रेश्माला सर्व बाजूंनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता (Success Story) तिच्या यशाने त्यांची छाती अभिमानाने फुलून गेली आहे. हमाली करत असून देखील बाजीराव ऱ्हाटोळ यांनी एका मुलाला आयटीआय, तर दुसऱ्या मुलाला बीएस्सी पर्यंत शिकवले आहे. तर आता रेश्माने राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षेत ओबीसी महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली आहे. यामुळे तिचे कुटुंब आणि समाजात देखील विशेष कौतुक होत आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com