सततच्या कोसळणाऱ्या दुःखाच्या डोंगरामध्ये ती खचली नाही; मुख्याधिकारी होऊनच केले स्वतःला सिद्ध

करिअरनामा ऑनलाईन । काही लोक असतात की कितीही संकटे आली तरी मागे हटत नाहीत. आपल्या ध्येयाकडे ते अर्जुनाप्रमाणे पाहत असतात. आणि काही वेळा अपयश आले तरी सुद्धा ते जिद्दीने परत कामाला लागून यशाच्या आनंदाने ते अपयश धुवून काढतात. आम्ही अशीच एक कहाणी तुम्हाला सांगणार आहोत, यामध्ये दुःखाचे डोंगर कोसळून पण तिने हार न मानता कष्ट करून शेवटी अधिकारी होऊनच विश्रांती घेतली. एमपीएससीची मुख्य परीक्षा तोंडावर आली त्यावेळी आजीला रुग्णालयात दाखल केले होते. त्याच काळात आजी वारली. त्यावेळी अवघ्या तीन गुणांनी पोस्ट मिळायची राहून गेली. त्यानंतर आईला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंब खचून गेले. अवघ्या चार दिवसांवर मुख्य परीक्षा आली असताना आई सोडून गेली. त्या स्थितीतही परीक्षा दिली; मात्र हाती निराशाच आली. सतत दु:खाचे डोंगर कोसळत असताना देखील खचून न जाता त्याच जिद्दीने अभ्यास करून तिने एमपीएससीचा गड अखेर सर करत नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती मिळवली.

ज्योती सुरेश भगत असे या अधिकारी मुलीचे नाव आहे. मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी आई-वडिलांनी तिन्ही भावंडांना शिक्षणासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी ठेवले. ज्योतीने वयाच्या पाचव्या वर्षी घर सोडले. दहावीनंतर तिने पुण्यात पाऊल ठेवले. लष्करी सेवेत जाण्याचे स्वप्न होते. त्यावेळी फुटबॉल स्पोर्ट अकादमीचे विनय मुडगोड यांनी तिचा शैक्षणिक आलेख आणि कल पाहता त्यांनी तिला प्रशासकीय सेवेत जाण्याचा सल्ला दिला. तो सल्ला मानून ज्योतीने प्रशासकीय सेवांचा अभ्यास सुरू केला.

सततच्या दुःखी घटनांनी खचून न जाता तिसऱ्या संधीला ज्योती एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली. दरम्यान, तिच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच मुलाखत होती. हळद-देवकार्य या सगळ्यामध्ये मुलाखत उरकून घ्यायची होती. त्यावेळीही सासरच्यांनी आणि घरच्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. एमपीएससीचा निकाल लागला परंतु यादीत ज्योतीचे नाव नव्हते. या परिस्थितीतही तिने जिद्द सोडली नाही. “कष्टाचे फळ देव देतोच’ या उक्ती प्रमाणे पुनर्निकालात ज्योतीचे नाव झळकले. तिची नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून निवड झाली. तिचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार यात काही शंका नाही.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com