रयत शिक्षण संस्था आत्मविश्वास असणारी पिढी निर्माण करतेय – शरद पवार

नाशिक प्रतिनिधी | आज रयत शिक्षण संस्थेत राज्यातीलच नाही तर राज्याबाहेरील मुलेदेखील शिक्षण घेत आहेत. यातून समाजात ही पिढी आत्मविश्वासाने उभी राहते आहे. हेच कर्मवीर अण्णांचे स्वप्न होते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेविषयी गौरवद्गार काढले. संस्थेच्या विंचुर,ता. निफाड,जि. नाशिक येथील नूतन शालेय इमारतीचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. यावेळी पवार बोलत होते.

शैक्षणिक क्षेत्रात मुलांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. नाशिक जिल्हा जसा इतर क्षेत्रात पुढे जातोय तसाच शिक्षण क्षेत्रात पुढे नेण्याची गरज आहे. रयत शिक्षण संस्थेमार्फत हा प्रयत्न होतोय. या सगळ्याचे प्रमुख कारण ज्ञान संवर्धन करण्याची काळजी संस्था घेतेय,हे काम आपल्याला वाढवायचे आहे असे मत यावेळी पवार यांनी व्यक्त केले. २७-२८ वर्षांपूर्वी मी इथे इमारतीच्या उद्घाटनासाठी आलो होतो.आज पुन्हा संस्थेच्या नव्या वास्तूच्या उद्घटनास येण्याची संधी लाभली असेही पवार यावेळी म्हणाले.

नाशिक जिल्ह्यात शेतीबाबत चांगले प्रबोधन झाले आहे. आज भारताबाहेर चांगली बाजारपेठ मिळेल का याकडे आम्ही लक्ष देत आहोत. यासाठी आम्ही एक बैठक घेतली. चीन या देशाची फळांची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपल्या इथल्या द्राक्षांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम आम्ही केलेय. यातून शेतकऱ्यांना स्थिरता येईल व यासोबतच शेतीव्यतिरिक्त इतर घटकांना संधी देण्याचे काम कसे होईल याबाबत भर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातही आज ना उद्या यश आल्याशिवाय राहणार नाही. हे बदल घडवण्याचा पाया शिक्षण हाच आहे असेही पवार यांनी सांगितले.