तीन ते चारच तास शाळा मधली सुट्टी बंद – वर्षा गायकवाड

करिअरनामा ऑनलाईन । दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरु करण्याची तयारी केली असून विद्यार्थ्यांची गर्दी टाळून शाळा भरविण्यात येणार आहे. कोरोना संकट असताना शिक्षण चालू करणे आव्हानात्मक असले तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षण याला विचारात घेऊनच शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करत असताना केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करूनच अध्ययन – अध्यापन प्रक्रिया सुरू होणार आहे . 40 मिनिटांचे चार तासच शाळा होणार आहे. ही शाळा भरवताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची सुचनाही शिक्षण विभागाने या पुर्वीच जाहीर केल्या आहेत व या सूचनांचे पालन होते आहे की नाही याची तपासणी संबंधित अधिकारी करणार आहेत. शाळा सुरू करण्यापुर्वी जिल्हा प्रशासन व महापालिके द्वारा शिक्षकांची आरोग्य तपासणी होणार आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजने अंतर्गत आरोग्य चाचणी राज्यात होतच आहे. अशा वेळी शाळेतील वर्ग सुविधा असल्यास खुल्या मैदानावर, मोकळ्या जागेत तसेच खेळत्या हवेच्या वर्गात घेण्याचीही मुभा शाळा व्यवस्थापनास दिली आहे. शाळेच्या आवारात एका वेळी ४ पेक्षा अधिक विद्यार्थी एकत्र जमणार नाहीत तसेच परिपाठ ,खेळ ,स्नेहसंमेलन या विद्यार्थ्यांना एकत्र आणणाऱ्या उपक्रमांना परवानगी देण्यात आली नाही.तसेच मधली सुट्टी ही होणार नाही.

शाळेच्या आवारात आणि शिकवताना शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मास्क घालणे बंधनकारक आहे. पालकांनी आणि प्रशासनाने विद्यार्थ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.ऑनलाईन शिक्षणात शिकवलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी, शंका समाधान व नवा विषय प्रत्यक्ष वर्गात शिकवला जाईल. दहावी व बारावीच्या परीक्षा संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व शिक्षण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. सर्व साधारणपणे या वर्षी परीक्षा उशिरा घेण्यात येतील असा अंदाज आहे. विदर्भातील ऊन, कोकणातील पाऊस व इतर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊनच मे महिन्याच्या सुरुवातीला परीक्षा होऊ शकतात कारण राज्यातील सर्व जिल्ह्यातील परीक्षा एकाच वेळी घेणे ही फारच महत्त्वाचे आहे. कोरोना मुळे शिक्षण थांबले नाही, तर या आजाराने नैतिक जबाबदारी, सामुहिक जबाबदारी, स्वच्छता, आरोग्य या गोष्टींची प्रकर्षांने ओळख समाजाला झाली अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com