सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची तांत्रिक अडचण मिटली, ऑनलाईन परीक्षेची नवी तारीख जाहीर

पुणे । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मंगळवारी ( 13 ऑक्टोबर) होणाऱ्या ऑनलाईन परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. त्यानंतर तांत्रिक अडचणी मिटल्या असून, रद्द झालेल्या 5 विषयांच्या परीक्षा आता शनिवारी (17 ऑक्टोबर) होणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनाने सांगितलं आहे. (Savitribai Phule Pune University online exams problems)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेला 12 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ उडाल्याचं दिसून आलं. त्यानंतर परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंळवारीसुद्धा (13 ऑक्टोबर) परिस्थिती सारखीच राहिली. विद्यापीठाने मंगळवारी 5 विषयांच्या परीक्षेचे आयोजन केले होते. पण ऐनवेळी ओटीपी न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. त्यांना परीक्षेला बसता आले नाही. यावेळी काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे परीक्षा रद्द कराव्या लागल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. मंगळवारी (13ऑक्टोबर) रद्द केलेल्या परीक्षा आता शनिवारी (17 ऑक्टोबर) होणार आहेत.

ऑनलाईन परीक्षेचा फज्जा
पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत मोठा गोंधळ ऊडतोय. विद्यार्थ्यांना ऐनवेळी लॉगीन आयडी आणि पासवर्ड न मिळाल्याचे प्रकार समोर आले आहेत. अचानक काही अडचण आली तर, विद्यार्थ्यांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर दिले आहेत. मात्र, फोन केल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याचं विद्यार्थांकडून सांगण्यात येत आहे.

पुणे विद्यापीठाने आतापर्यंत एकूण पाच वेळा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. इंग्रजी विषयाचा पेपर विद्यार्थ्यांना मराठी माध्यमात आला. तर काही विद्यार्थ्यांना लॉगीन आयडी आणि पासवर्ड उशीराने मिळाला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, हायड्रॉलिक्स आणि न्यूमॅटिक्स विषयांच्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना आकृत्या स्पष्ट दिसत नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना 10 प्रश्न सोडवता आले नाही.

ऑफलाईन परीक्षेतही गोंधळ
पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 12 ऑक्टोबरपासून सुरु झाली. मात्र, पहिल्याच दिवशी ऑफलाईन परीक्षेचा खोळंबा झाल्याचं दिसलं. विद्यापीठाकडून ऑनलाईन पाठविल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकांची प्रिंट घेण्यासाठी आवश्यक असणारा ओटीपी न मिळाल्याने पहिल्या सत्रातील परीक्षा ठप्प झाली. सकाळी 10 चा पेपर दुपारी 12 ला सुरु झाला.

दरम्यान, राज्यभरात ऑनलाईन परीक्षेचा गोंधळ उडाल्याचं दिसून आलंय. पुण्यासोबच, औरंगाबाद, मुंबई विद्यापीठातही सारखीच परिस्थिती आहे. त्यामुळे कोरोना महामारीत ऑनलाईन परीक्षेचे केलेले नियोजन पुरते बारगळल्याचे विद्यार्थी संघटनांकडून म्हटले जात आहे. तसेच पुणे विद्यापीठात परीक्षेच्या गोंधळाची चौकशी व्हावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.