‘UPSC’ साठी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात विशेष कोर्स….

करिअर मंत्रा ।  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांत पदवी अभ्यासक्रमच्या दुसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार असून कमी वयात स्पर्धा परीक्षांची तयारी करून यूपीएससीतील मराठी टक्का वाढण्याच्या आणि उच्च पदी विद्यार्थी पोहोचण्याच्या दृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ही माहिती दिली. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक आणि निवृत्त आयपीएस अधिकारी जयंत उमराणीकर या वेळी उपस्थित होते. नियमित पदवी अभ्यासक्रमादरम्यानच हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम विद्यार्थी करू शकतील. संध्याकाळी दोन तास मार्गदर्शन केले जाईल. स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले उत्तरे लिहिण्याचे कौशल्य, निबंध लेखन, इंग्रजीची उत्तम जाण, मुलाखतीचे तंत्र, तज्ज्ञांशी संवाद, व्यक्तिमत्त्व विकास या विषयी मार्गदर्शन केले जाईल.
‘स्वतच्या अनुभवातून या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. पूर्व परीक्षा ते मुलाखत या सर्व टप्प्यांवरील मार्गदर्शन केले जाईल. उत्तर प्रदेशसारख्या राज्यातील उमेदवार खूप लवकर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याने कमी वयातच निवडले जातात. तर महाराष्ट्रातील उमेदवार मागे पडतात. ही उणीव दूर करण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमाद्वारे केला जाईल,’ असे उमराणीकर यांनी सांगितले. यंदा अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी बारावीचे गुण ग्राह्य़ धरले जातील. अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ ऑक्टोबर आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, माहिती आणि प्रवेश

अर्ज- http://unipune.ac.in/cec/default.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.