‘MPSC परीक्षा पुढे ढकला, नाहीतर उद्रेक होईल!’ उदयनराजेंचा गंभीर इशारा

सातारा । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. ‘महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मराठी क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली आहे. तरीही सरकारने ११ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. जर सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तात्काळ घेतला घेतला नाही तर शासनाचे त्याचे परिणाम भोगावे लागतील,’ असा इशारा, खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

‘राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असताना तसेच मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आलेला असतानासुद्धा सरकारला एमपीएससीची परिक्षा घेण्याची एवढी घाई का? असा सवाल उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट करत उपस्थित केला आहे. तर, मराठा समाज जितका संयमी आहे, तितकाच तो आक्रमकही आहे. यांची जाणीव ठेवून सरकारने एमपीएससीच्या परीक्षेसाठी संपूर्ण मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नका,’ असा सूचक इशाराही उदयनराजे यांनी दिला आहे.

येत्या ११ तारखेला एमपीएससीची परीक्षा घेतल्यास मराठा तरुणांचे न भरून येणारे मोठे नुकसान होणार आहे. तरीही, सरकारने परीक्षा घेण्याची अन्यायकारक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाला कोर्टात स्थगिती दिल्यानंतर लगेच १५ हजार जागा भरण्याची सरकारला इतकी घाई का झाली आहे? आरक्षणाच्या स्थगितीमुळं मराठा समाजात मोठी चीड निर्माण झाली आहे. तरीसुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार करत आहे, अशी टीका उदयनराजे यांनी केली आहे.