आता ‘या’ वेळेत होतील राज्यात ऑनलाईन वर्ग; बालवाडी ते १२वी पर्यंतच्या वर्गांचं वेळापत्रक जाहीर

मुंबई । कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं ऑनलाईन शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली आहे. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं वर्ग घेतले जाणार असल्याचं सरकारनं यापूर्वीच जाहीर केलं होतं. त्यानुसार राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचं वेळापत्रक ट्विट करून जाहीर केलं आहे.

कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असल्यानं राज्य सरकारनं १५ जून पासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली. मात्र, स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर अशा भागात ऑनलाईन पद्धतीनं शिकवणी वर्ग घेण्याचं नियोजन शिक्षण विभागानं केलं आहे. आता बालवाडी ते बारावीपर्यंतच्या वर्गांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

१) पूर्व प्राथमिक (बालवाडी) – सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन वर्ग होणार आहे. याचा कालावधी प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचा असणार आहे. या वर्गांमध्ये पालकांशी संवाद करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे.

२)पहिली व दुसरी – सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचे दोन वर्ग घेण्यात येणार आहे. यामध्ये १५ मिनिटं विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद मार्गदर्शन असणार आहे. तर उर्वरित १५ मिनिटं विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण दिलं जाणार आहे.

हे पण वाचा -
1 of 2

३) तीसरी ते आठवी – या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांचे दोन वर्ग घेतली जाणार आहेत. यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण दिलं जाणार आहे.

४) नववी ते बारावी – या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४५ मिनिटांची चार सत्रे असणार आहेत. त्यातून त्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण दिलं जाणार आहे.