स्पर्धा परीक्षा नवीन पदभरती; ‘शासन निर्णय आणि आपण…’              

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) वा इतर सरळ सेवा भरतीची तयारी करत असलेल्या आणि विशेषतः आपल्या स्वप्नपूर्ती साठी अन्य गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवत आलेल्या विद्यार्थी मित्र-मैत्रीणींना मनापासून विनंती करायची आहे की, करोना पार्श्वभूमी वरती राज्याच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात जो शासन निर्णय आला आहे; त्यातील मुद्दा क्रमांक १४ तील ‘नवीन पद भरती करू नये’ या शब्द प्रयोगाने कृपया विचलित होवू नका.

अगोदरच करोना महामारीने तुमच्या संयमाची परीक्षा  घेतली आहे, त्यात आता हे प्रकरण. धक्का बसणे स्वाभाविक आहे. मात्र सर्वत्र व्हायरल झालेल्या त्या ‘पीडीफ’मुळे/शासन निर्णयामुळे जर तुम्ही व्हायबल होणार असाल आणि अभ्यास सोडून त्याची खातरजमा करण्याच्या पाठीमागे लागणार असाल, तर मग तुम्ही तुमच्या ध्येयापासून नक्कीच विचलित होत आहात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या 2020 च्या परीक्षा होणारच. त्या होणार नाही असे कोणीच म्हटलेले नसताना उगीच तारे तोडणे आपले काम नव्हे. अशा काळात विचलित झालात तर मात्र याची जबर किंमत तुम्हाला नक्कीच मोजावी लागेल. करोना दणका देणार हे मी “स्वत:ला एक झटका द्या” या लेखात अगदी शेवटी सांगितले होते.(लेख टेलग्राम वर उपलब्ध आहे) करोना नंतर पद भरती वर संक्रांत येणारच नाही याची शाश्वती कोण देणार असा तो उल्लेख होता.

आगामी परिस्थितीमधून आपल्या हे निदर्शनास येवू शकते. मात्र आत्ताची प्रक्रिया थांबवली जाईल अशी शक्यता फार कमी वाटते. ते काही ही असो. आजच्या घडीला आपण मी तयारी सोडून देतोय असं म्हणू शकतो का..? फक्त चर्चेने प्रश्न सुटत नसतो. त्यामुळे आपल्या हाती कार्यरत राहणे हेच आहे. माझ्या संपर्कात असे काही कॅलिबर असणारे विद्यार्थी आहेत की, त्या पदभरती आदेशामुळे त्यांच्यात बिलकुल फरक पडलेला नाही. रिझल्ट देणारा व न देणारा यांच्यात इथेच फरक कळतो. अशा लोकांचा अभ्यास  सुद्धा चेक करावा लागत नाही. सलाम आहे त्यांना.

ध्येयाप्रती निष्ठा असणे व कोणत्याही, कसल्याही परिस्थितीत अविचल राहणे हे यांचे लक्षण अशा काळात प्रकर्षाने जाणवते. शेवटी इतकेच सांगेन की काल ज्या तडफेने, तत्परतेने कृती करत होता तीच तडफ आजही जपा. सोशल मीडिया (त्यात टेलिग्राम देखील आलेच) पासून स्वत:ला अलिप्त ठेवा. आपल्या अभ्यासावर टिकून रहा. आपला विजय इथेच आहे. यश अशाच छोट्या छोट्या कृतीतून आकाराला येत असते हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे.

मिथुन पवार,
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक,
8275933320.
Telegram:  t.me/mithunpawar

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com