72 हजार नव्हे, दीड लाख पदं भरणार! मेगाभरतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे. विविध विभागांमध्ये दीड लाख पदं भरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. विशेष म्हणजे यापूर्वी 72 हजार पदं भरण्याचं जाहीर करण्यात आलं होतं, ज्याची भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यात वाढ करुन हा आकडा आता दीड लाखांवर नेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. प्रक्रिया सुरु असल्याने याविषयीची अधिक माहिती लवकरच जारी केली जाण्याची शक्यता आहे.
लाखो मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. पण जाहिरातच न आल्याने दरवर्षी अनेकांची निराशा होता, तर काही जणांचं वय पात्रतेपेक्षा अधिक होऊन जातं. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारी नोकरीकडे डोळे लावून बसलेल्या तरुणाईच्या अपेक्षा यापूर्वीच्या घोषणेमुळे जाग्या झाल्या होत्या. शिवाय ग्रामविकास विभागाकडूनही विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या नव्या घोषणेनुसार भरती प्रक्रिया सुरु झाल्यास लाखो तरुणांचं सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी ज्या 72 हजार पदांच्या भरतीची घोषणा केली होती, त्याची प्रक्रिया याअगोदरच सुरु झालेली आहे. त्यामुळे नव्या घोषणेच्या अंमलबजावणीकडे आता लक्ष लागलंय. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांची क्षेत्रीय स्तरावरील 72 हजार पदे भरण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीचा आढावा राज्याच्या मुख्य सचिवांकडून घेण्यात येत होता.