जाणून घ्या! सोमवारपासून कोणत्या जिल्ह्यात शाळा सुरु, कुठे बंद?

करिअरनामा । कोरोना संकट आणि लॉकडाऊमुळे बंद असलेल्या शाळा येत्या 23 नोव्हेंबरपासून (school reopen) सुरु होण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यानुसार ९वी ते १२वीपर्यंतचे वर्ग भरवण्याचे नियोजन आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने, शाळा उघडण्याबाबत अनेक जिल्ह्यात संभ्रम दिसत आहे. राज्य सरकारने शाळांबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर सोपवल्याने या संभ्रमात आणखी भर पडली आहे. नेमका कोणता निर्णय घ्यायचा?, पालकांची संमती कशी मिळवायची?, विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याबाबत खबरदारी कशी घ्यायची? शिवाय 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असली तरी 50 टक्के विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन असेल, ते मॅनेज कसं करायचा असा प्रश्न शिक्षक आणि प्रशासनासमोर आहे. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अन्य जिल्ह्यात शाळा सुरु होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. (Maharashtra school reopening date)

औरंगाबादेत 3 जानेवारीपर्यंत शाळा बंद
औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा तीन जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी मनपा क्षेत्राचा, तर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याचा निर्णय घेतला. कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर शाळा तीन जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत शाळा बंद
मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. याशिवाय ठाणे आणि पनवेलमधील शाळाही बंद राहणार आहेत. त्यानुसार येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुंबई, ठाणे, पनवेलमधील शाळा बंदच ठेवण्यात येणार आहेत.

नाशिकमधीळा शाळांबाबत रविवारी निर्णय
नाशिकमधील शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा, की पुढे ढकलावा याबाबत तातडीची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत. पहिल्या दिवशी 60 हजार विद्यार्थी शाळेला उपस्थित राहतील असा अंदाज आहे. दुसऱ्या दिवशी 60 हजार विद्यार्थी उपस्थित राहतील.

कोणत्या जिल्ह्यात शाळा सुरु, कुठे बंद?
मुंबई, ठाणे, पनवेल – 31 डिसेंबरपर्यंत बंद
नाशिक – रविवारी अंतिम निर्णय
पुणे – अद्याप कोणताही निर्णय नाही
अहमदनगर – 23 नोव्हेंबरपासून सुरु
नागपूर – शाळा सुरु होणार
कोल्हापूर – शाळांचं सॅनिटायझेशन सुरु
रत्नागिरी- अद्याप कुठलाही निर्णय नाही
सिंधुदुर्ग- अद्याप कुठलाही निर्णय नाही
रायगड – पनवेल वगळून 23 तारखेपासून शाळा सुरु
सोलापूर – सोमवारपासून शाळा सुरु
औरंगाबाद – शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद राहणार
नांदेड – नववी ते बारावीची शाळा सोमवारपासून होणार सुरू
बीड -अद्याप कुठलाही निर्णय नाही
नंदुरबार – सोमवारी सुरू होणार