आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकची नवी ओळख ; नांदूरमध्यमेश्वरला मिळाला रामसर दर्जा

करिअरनामा । महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याला ‘रामसर’चा दर्जा प्राप्त झाला आहे.  केंद्रीय पर्यावरण समितीने याबाबत शनिवारी घोषणा केली.  त्याचे पत्र लवकर नाशिक वन्यजीव विभागाला प्राप्त होणार आहे. नाशिकचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनीही यास दुजोरा दिला आहे.

मात्र अभयारण्याला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्याने वनविभागाला पुढील काळात वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. गाळपेरा जमिनीसह, जलप्रदुषण, जलपर्णीचे वाढते साम्राज्य अशा वेगवेगळ्या जटील प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी वनविभाग व्यवस्थापन आराखडा तयार करत असून या माध्यमातून प्रश्न सोडविण्यात येणार आहेत.

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य रामसर यादीत समाविष्ट झाल्याने अभयारण्याच्या संवर्धनासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न होतील. यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच अभयारण्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष दर्जा प्राप्त होणार आहे. वनविभाग १० वर्षांपासून हा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्नशील होता. मात्र आता दर्जा प्राप्त झाल्यानंतर विभागापुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अभयारण्यात देश-विदेशातील वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी वास्तव्यास आहेत. नांदुरमध्यमेश्वर धरण परिसर, पाणथळ जागा पक्ष्यांच्या मुक्कामासाठी अनुकूल असल्याने अभयारण्य परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट कायम आहे.

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.