४ माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरु करणारं महाराष्ट्र ठरलं एकमेव राज्य

मुंबई । पहिली ते दहावी मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ४ युट्यूब चॅनेल सुरु केले असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा युट्यूब चॅनेल सुरु होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने चार युट्यूब चॅनेल सुरु केले आहेत. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा सुरु होणार आहेत. इयत्ता तिसरी ते बारावीसाठी आता जिओ टीव्ही वर एकूण १२ चॅनेल सुरु करण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे ज्याने ४ माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरु केले आहेत”.

याआधी वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचं वेळापत्रक ट्विट करून जाहीर केलं होतं. करोनाचा जास्त प्रादुर्भाव असल्यानं राज्य सरकारनं १५ जून पासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली. मात्र, स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर अशा भागात ऑनलाईन पद्धतीनं शिकवणी वर्ग घेण्याचं नियोजन शिक्षण विभागानं केलं आहे. आता बालवाडी ते बारावीपर्यंतच्या वर्गांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”