ठाकरे सरकारची मोठी घोषणा! MPSC मार्फत 15,500 जागांसाठी लवकरच मेगा भरती

मुंबई : कोरोना महामारिमुळे सध्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकारी भरती प्रक्रियेलाही लाॅकडाऊनमुळे अडथळे तयार झाले होते. अशात पुण्यात एका स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे सरकारला सरकारी भरती काढण्यास विरोधीपक्षाकडून दबाव वाढला होता. यापार्श्वभुमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. MPSC मार्फत 15,500 जागांसाठी लवकरच मेगा भरती होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. गट अ ते क पर्यंतची एकूण १५ हजार ५११ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भरणे यांनी दिली आहे.

‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्‍त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग इत्यादी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे असे भरणे यांनी यावेळी सांगितले आहे.

तसेच गट अ ४ हजार ४१७ पदे, गट ब ची ८ हजार ३१ पदे आणि गट क ची ३ हजार ६३ पदे अशी एकूण १५ हजार ५११ पदे भरण्यास वित्त विभागाने सन २०१८ पासून मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पद भरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने एमपीएससी सदस्यांची ४ रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. सदस्यांची ही पदे भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबतही बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यसंख्येत वाढ करण्याच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा करण्यात आली. जेणेकरुन भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील असं मंत्री भरणे यांनी म्हटलं.