ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ तारखेपासून शाळा पुन्हा सुरु होणार

मुंबई : कोरोना मुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून येत्या सोमवारी म्हणजे 24 तारखेपासून शाळा सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे.

शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला होता त्यावर त्यांनी मंजुरी दिली आहे. येत्या सोमवार पासून म्हणजेच 24 जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. पालकांची समंती असल्यानंतर विद्यार्थी शाळेत येतील. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी आम्ही घेत आहोत असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

निवासी शाळांच्या बाबत नंतर निर्णय

निवासी शाळा सुरु करण्यासंदर्भात आम्ही येणाऱ्या काळात निर्णय घेणार आहोत. निवासी शाळा किंवा वसतीगृहात गेल्या काळात विद्यार्थ्यांना कोरोना झाला होता. त्यामुळं निवासी शाळा सुरु करण्यासंदर्भात येत्या काळात आम्ही निर्णय घेणार आहोत. शाळा सुरु करण्यासाठी आम्ही शिक्षणतज्ज्ञ, टास्क फोर्स आणि शिक्षण विभागातालील अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरु करण्याच्या फाईल वर सही केली आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण देणार

कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी शाळा सुरु करण्याचे अधिकार हे स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. शाळा सुरु करण्याबाबत जारी करण्यात आलेली नियमावली जिथं पाळली जाईल तिथेच शाळा सुरु होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून ऑनलाईन शिक्षण देखील सुरु ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.