ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! राज्यात तब्बल १२ हजार ५०० पोलिसांची भरती

करिअरनामा । राज्यावर करोना संकट असून बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान ठाकरे सरकारने राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून यानिमित्ताने राज्यातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात १२ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरती कऱण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी मोठी भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु केली जाणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणांनी पोलीस खात्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे”. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला होता. शिवाय अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली होती. त्यात काही पोलिसांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे पोलिसांवरील हा ताण कमी करण्यासाठी पोलीस दलात नवी भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.

या पूर्वी जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पोलीस दलात दहा हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी गृहविभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव आला होता. त्यात उपमुख्यमंत्र्यांनी आणखी दोन हजार जागा वाढवल्या होत्या. आज झालेल्या मंत्रिंडळाच्या बैठकीत आणखी अडीच हजार जागांची भर घालून साडेबारा हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला.