[स्पर्धा परीक्षा] द्विधा मनस्थिती असेल… तर हे क्षेत्र सोडून द्या

करिअरनामा । सर परीक्षा रद्द झाल्या का? परीक्षा कधी होणार? तारीख जाहीर कधी होणार? असे फोन आणि मेसेज अजूनही कमी झालेले नाहीत अशा लोकांना  मी पहिला प्रश्न विचारतो की, “असं समजा या वर्षी परीक्षा होणार नाहीत, असा निर्णय शासनाने केला तर मग सांगा तुमच्यापैकी किती जण हे क्षेत्र सोडून दुसरं काहीतरी करणार आहेत ?” ज्याच्याकडे दुसरा पर्याय आहे त्यांनी विचारले तर एक वेळ समजू शकतो. परंतु, प्रत्येकजण हेच विचारू लागला तर मात्र त्यांनी अंतर्मुख होऊन स्वतःला आपण हे सगळं सोडून देणार आहोत का ? हे एकदा जरूर विचारावं आणि त्या प्रश्नाचे उत्तर ‘येस’ आणि ‘नो’ पैकी एक असेल तर तुमचं अभिनंदन.

मात्र तळ्यात-मळ्यात असणाऱ्यांना थेट सांगतो, “स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर ती सोडून द्या. तुमच्याकडून ते होणारच नाही. तुमचा हा प्रांत नव्हे नक्कीच दुसरं काही तरी बघा.” आता प्रश्न राहिला ‘नो’ वाल्यांचा म्हणजे तयारी करणं सोडणार नाही असं म्हणणाऱ्यांचा यांचेतील जे कोणी परीक्षा रद्द होणार का? आणि ती झाली तर कधी होणार? याच विचारात जर दिवस ढकलत असतील तर ते आई वडिलांबरोबर स्वतःलाही फसवत आहेत अस समजायला हरकत नाही.

नियोजनाच्या दृष्टीने परीक्षा कधी होणार असा विचार असेल तोही तात्पुरता; तर ठीक पण “भुंकणारे चावत नाहीत” प्रमाणे केवळ परीक्षा,परीक्षा, शासन निर्णय यावर गावगन्ना भाषण ठोकणारे परीक्षेतच नव्हे तर कुठेच यशस्वी होणार नाहीत हे प्रत्येकाने मनावर कोरून  ठेवा. ज्याने मागील काही दिवसात काही भरीव करून दाखविले आहे तसेच  ज्यांची अजूनही धडपड चालू आहे  त्यांचेसाठी दोन शब्द जरुर खर्ची घालता येतील.

मित्रांनो, असं म्हणतात बघा “वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार – केलेली कृती आणि पीक करपून गेल्यानंतरचा पाऊस यांची किंमत सारखीच.”

तुम्ही जर काय होणार? काय होणार? यात गुंतून राहिलात तर या वाक्यापेक्षा वेगळी स्थिती तुमची नसणारच. दरवर्षी जागा किती असतात, त्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून कितीजण तयारी करतात हे सर्वांना माहिती आहे.

खरी स्पर्धा त्यांतच आहे, ज्यांची करोना येण्यापूर्वी तयारी होतीच, करोना काळातही ते टिकून राहिले आणि आता परत भरती संबंधी शासन निर्णय आल्यानंतरही ते अविचल आहेत. तुम्हा पैकी अनेकांना पटणार नाही  पण तरी सांगू इच्छितो माझ्या संपर्कात हाताच्या बोटावर मोजण्या इतपत असतील पण या कॅटेगरीत मोडणारे निश्चितच काही विद्यार्थी आहेत आणि ते हे परीक्षा कधीही झाली तरी बाजी मारणारच. वरती म्हटलंच आहे लिस्ट मध्ये तर कुठे जास्त जागा असतात?  ती छोटी लिस्ट भरण्यासाठी एवढे पुरेसे ठरतात  किंबहुना त्यांची बेरीज केली तर झाली लिस्ट पूर्ण.  मग तुमचा काय उपयोग?  करतोय तयारी आपला चार-पाच वर्षे झाली.

मग करोना मुळे घरी जावं लागलं, रुटीन बिघडलं नावानं बोंब मारायची. हे नित्याचेच. हे लोक पूर्वी कधीच स्पर्धेत नव्हते ,ना पुढे स्पर्धेत असतील. प्रत्येकाने आपापली वर्गवारी ओळखावी आणि आणि स्वतः बाबतचा निर्णय एकदाचा घेऊनच टाकावा. एवढे टोकाचं बोलावं लागतंय कारण तसा अनुभव गेले काही दिवस मी घेतोय.

लक्षात घ्या हा शांततेचा काळ आहे मी मागेही एका लेखामध्ये अशी अगदी उंबरठ्यावर आलेली आयोगाची परीक्षा पुढे जाण्याची मी पाहिलेली बहुदा ही पहिलीच वेळ असावी, असं बोललो होतो. खरेतर ही सुवर्णसंधी मानायला हवी. आपले कच्चे दुवे, कच्चे विषय प्रत्येक वेळी राहून गेलेले किंवा स्किप केलेले विषय चोपून काढायला हवेत. ज्यांना पूर्व परीक्षेची 100%  खात्री आहे, त्यांनी मेन्स मधील कोअरच्या विषयांना हात घालावा. परीक्षा तारखा आल्यानंतर ही किमान 20 ते 25 दिवस मिळतील हे गृहीत धरून आखणी करता येईल.

प्रत्येक ठिकाणी सबब सांगता येतेच पण कोणत्याही परिस्थितीत कष्टाची तयारी आणि त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी असेल तर आतून आग लागतेच लागते. त्यातून काहीतरी सकारात्मक घडूच शकतं.  सतत  युट्युब वर हजारो मोटीवेशनल व्हिडिओज ऐकून पाहून काही होणार नाही. बाह्य प्रेरणा काहीच करू शकत नाहीत. हो अनेक जण सांगतात सर लेख वाचल्यावर अभ्यासाला गती येते. परंतु ती दीर्घकाळ टिकलीय असं कोणी सांगताना दिसत नाही.

बरोबर आहे एक ठिणगी जरूर उडते परंतु त्यातून त्याच जोरावर मशाल पेटती-धगधगती  कशी राहील ही जबाबदारी सर्वस्वी तुमचीच असणार.

मिथुन पवार,
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
Contact: 8275933320
Telegram: t.me/mithunpawar