‘रंगीबेरंगी’ करिअर’ । पेंट टेक्नॉलॉजीमध्ये शिका रंग बनवण्याचं तंत्र

करिअरनामा ऑनलाईन ।पेंट टेक्नॉलॉजी या रंगाचा शास्त्रीय अभ्यास करण्याच्या शाखेचा उपयोग अनेक व्यवसायात केला जातो. रंग जरी आपल्याला आकर्षित करत असले तरी अनेक वेळा त्यांचा उपयोग गोष्टीचं संरक्षण करण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. खासकरून लोखंडी वस्तू गंजू नयेत, वातावरणाचा परिणाम वस्तूवर होऊ नये व वस्तू बऱ्याच काळापर्यंत टिकून राहाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणावर रंगांचा उपयोग होतो.

रंगामध्ये विविध काम करण्यासाठी अनेक रासायनिक द्रव्यांचा वापर केलेला असतो. रंग बनवताना घन स्वरूपातील रंगाला द्राव्य माध्यमामध्ये मिसळलं जातं. विविध वस्तूंवर संरक्षणासाठी अथवा सजावटीसाठी रंगाचा वापर केला जातो. रंगामधील रासायनिक द्रव्यांचा समावेश त्यांच्या उपयोगानुसार केला जातो. (उदा. गंजप्रतिरोधकता). पेंट टेक्नॉलॉजीमध्ये विविध घटकपदार्थांचा (उदाहरणार्थ राळ, पॉलिमर, नैसर्गिक रंग इत्यादी) अभ्यास करावा लागतो, जे रंग बनवण्यासाठी वापरले जातात. रंगात वापरण्यात येणाऱ्या घटकद्रव्यांच्या गुणधर्माचा अभ्यास करून रंगामध्ये त्यांच्या उपयोगितेचं परीक्षण करावं लागतं. विविध पृष्ठभागांवर त्यांच्या
भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार विविध प्रकारच्या रंगांची निर्मिती केली जाते. विविध उद्योगांकडून असणाऱ्या आवश्यकतांचा पेंट टेक्नॉलॉजीमध्ये अभ्यास केला जातो.

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, माटुंगा, मुंबई या संस्थेमध्ये बीटेक (पेंट टेक्नॉलॉजी) हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तसेच एम. टेक्. (पेंट टेक्नॉलॉजी) हा पदव्युत्तर अभ्यासक्रमदेखील उपलब्ध आहे. गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट,विद्यानगरी, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (पू.), मुंबई या संस्थेमध्ये बारावी विज्ञान शाखेनंतरचा तीन वर्षांचा बीएससी पेंट टेक्नॉलॉजी हा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

अधिकृत वेबसाईटhttp://www.gicededu.co.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com