आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; 3 डिसेंबर रोजी गुणवत्ता यादी होणार जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने ‘एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेचे पुढील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज, अर्जात दुरुस्ती करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची वेळ देण्यात आली होती. ३ डिसेंबर रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

आयटीआयची प्रवेश प्रक्रियाही ९ सप्टेंबरपासून थांबली होती. २०२१-२१ शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण न ठेवता सदर वर्गात अर्ज केलेल्या उमदेवारांचा अर्ज खुल्या प्रवर्गासाठी ग्राह्य धरण्यात यावा असे, सरकारने निर्देश दिले. त्यानंतर प्रवेशाचे पुढचे सुधारित वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासह अर्जातील दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जात बदल करून आपला प्रवेश अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने म्हटले आहे.

प्रवेशाच्या चार फेऱ्यांसह एक समुपदेशन फेरी असणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेतील माहिती विद्यार्थ्यांना वेबसाइटसह एसएमएसद्वारेही कळविण्यात येणार असल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –https://careernama.com