आयटीआय प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर; असा भरा प्रवेश अर्ज

मुंबई। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात झाली आहे. आयटीआय प्रवेशाची तारीख देखील जाहीर करण्यात आलीय. आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ ऑगस्टपासून प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण इच्छूक विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत आयटीआयसाठी अर्ज करावा असे आवाहन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले. प्रत्येक युवकास कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

३५८ तालुक्यात ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ९२ हजार ५५६ इतकी आहे. आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी २ स्वतंत्र संस्था व ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. राज्यात ५६९ खाजगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ५३ हजार २७२ आहे. शासकीय आणि खाजगी ९८६ आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता १ लाख ४५ हजार ८२८ विद्यार्थी इतकी आहे.

शैक्षणिक पात्रता
प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही.

दहावीची समकक्षता
दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परिक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता दहावीची समकक्षता देण्यात येते.

ऑनलाईन प्रक्रिया
यंदा प्रवेश अर्ज भरण्यापासून हरकती नोंदविण्यापर्यंतची सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलायं.