शिक्षक-विद्यार्थ्यांना दिलासा! दिवाळीच्या सुट्टीत वाढ, आता 14 दिवसांची शाळांना सुट्टी जाहीर

करिअरनामा । विद्यार्थी व शिक्षकांच्या भावनांचा आदर करून व त्यांच्या वाढीव दिवाळीच्या सुट्टीच्या मागणीचा विचार करून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्यापासून म्हणजेच 07 नोव्हेंबर 2020 ते 20 नोव्हेंबर 2020 पर्यत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. 5 नोव्हेंबर 2020 मधील परीपत्रकानुसार 12 नोव्हेंबर 2020 ते 16 नोव्हेंबर 2020 अशी केवळ 5 दिवसांचीच दिवाळी सुट्टी यंदा देण्यात आली होती. मात्र, आता परिपत्रकात बदल करून 14 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या या निर्णयाचे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. उन्हाळी व गणेशोत्सवाच्या सुट्टीतही ते सुरू होते. त्यामुळे दिवाळीमध्ये मोठी सुट्टी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, राज्य सरकारने 12 ते 16 नोव्हेंबर अशी फक्त पाचचं दिवस ऑनलाईन वर्गाला सुट्टी जाहीर केली. शाळांना पूर्वी दिवाळीची सुट्टी 21 दिवस होती.

त्यांनतर वार्षिक सुट्ट्या 80 ऐवजी 76 करण्यात आल्याने दिवाळी सुट्टी 18 दिवस केली. पण, कोरोनामुळे अभ्यास उशिरा सुरू झाल्याने दिवाळी सुट्टीसंदर्भात काढलेल्या परिपत्रकात ही सुट्टी फक्त पाच दिवसांची केली. त्यामुळे दिवाळीची सुट्टी हळूहळू कमी करण्यात येत आहे, असा आरोप शिक्षक, विद्यार्थी, पालकांकडून करण्यात येत होता. या सुट्टीवरुन विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त करत दिवाळी सुट्टी वाढवून देण्याची मागणी केली होती. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेऊन दिवाळीची सुट्टी 14 दिवसांपर्यंत वाढवली आहे. नवीन परिपत्रकानुसार उद्यापासूनच दिवाळीची सुट्टी शाळांना लागू होत आहे.