IIT, NIT इंजिनीअरिंगचे धडे आता मातृभाषेतून – रमेश पोखरियाल

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) पुढील शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंगचे धडे मातृभाषेतून देणार आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, ‘तांत्रिक शिक्षण, विशेषत: अभियांत्रिकीचं शिक्षण मातृभाषेत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि पुढील शैक्षणिक सत्रापासून हा निर्णय लागू होईल. यासाठी काही आयआयटी आणि एनआयटीची निवड केली जात आहे.’बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) शालेय शिक्षण मंडळाशी संबंधित समकालीन परिस्थितीचा आढावा घेत स्पर्धात्मक परीक्षांसाठी अभ्यासक्रम आणेल. या अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यापीठ अनुदान आयोगाला निर्देश देण्यात आले आहेत की सर्व शिष्यवृत्ती, फेलोशिप इत्यादी वेळेवर देण्यात याव्यात आणि या संदर्भात हेल्पलाईन सुरू करुन विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न त्वरित सोडवावेत.

एनटीएने गेल्या महिन्यात हिंदी व इंग्रजी व्यतिरिक्त नऊ प्रादेशिक भाषांमध्ये जेईईची मुख्य परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. मात्र, जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देखील प्रादेशिक भाषांमध्येही घेण्यात येईल की नाही, हे आयआयटीने अद्याप निश्चित केलेले नाही.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com