IIT GATE प्रवेशांसाठी गेट परीक्षा होणार – प्रा. दीपांकर चौधरी

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या  तर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच इंजिनीअरिंगच्या पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘Gate 2021’ ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार  असल्याचे परीक्षा समितीचे प्रमुख आय आयटी मुंबईचे प्रा. दीपांकर चौधरी यांनी स्पष्ट केले.

‘Gate 2021’  ही परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यात घेण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष  2021- 22 साठी होणारी  परीक्षा 5 ते 7 फेब्रुवारी आणि 12 ते 14 फेब्रुवारी अशा सहा दिवसांमध्ये होणार आहे. यंदा या परीक्षेच्या स्वरुपात बदल करण्यात आले आहेत. यात ‘पर्यावरण विज्ञान आणि इंजिनीअरिंग’ आणि ‘ह्युमॅनिटीज अॅण्ड सोशल सायन्सेस’ या दोन विषयांचा समावेश करण्यात आल्याने या परीक्षेसाठी एकूण 27 विषय असणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे, असे मतही चौधरी यांनी व्यक्त केले. यंदा या परीक्षेसाठी पात्रता निकषही शिथिल करण्यात आले आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांना बारावीनंतर चार किंवा तीन वर्षांचे पदवी शिक्षण पूर्ण करणे बंधनकारक होते. आता अखेरच्या वर्षाच्या परीक्षेस पात्र विद्यार्थ्यांनाही संधी दिली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे गुण वाढवण्याची आणखी एक संधी मिळणार असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.

या परीक्षेतील बदलांमुळे विद्यार्थ्यांना मानवता आणि सामाजिक विज्ञान या विषयांमध्येही करिअरची संधी मिळणार आहे. देशभरातील आयआयटी तसेच इतर विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या कक्षा रुंदावणार असल्याचा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com