IAS होणार असल्याचे सांगणारा तो ‘कंडक्टर’ खोटं बोलला; मुलाखतीच्या यादीत नावच नाही

करिअरनामा । बंगळुरुमधील बस कंडक्टर IAS होणार असल्याची बातमी स्थानिक ते राष्ट्रीय माध्यमांनी दाखवली. या बातमीची सोशलमीडियावरही चर्चा झाली. मात्र आता ही बातमी खोटी असल्याचे समोर आलं आहे. बंगळुरूमधील बस कंडक्टर मधू यूपीएससीच्या मुलाखतीसाठी पात्र झाला अशा अर्थाची ती बातमी होती. आता मात्र त्याचे नाव मुलाखतीस पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या यादीत नसल्याची माहिती समोर आली आहे.

बंगळुरूमधून प्रसिद्ध होणाऱ्या मिरर वर्तमानपत्रात ही बातमी प्रसिद्ध झाली होती. मिररच्या संपादकांनी ही खोटी बातमी प्रकाशित केल्याबद्दल माफी मागितली आहे. ही बातमी स्थानिक ते राष्ट्रीय माध्यमांनी दाखविल्यानंतर कंडक्टर मधूला देशभरातून मदतीचा ओघही सुरू झाला होता. मात्र ही बातमी खोटी असल्याचे समोर आल्यावर मदत करणाऱ्या लोकांचा भ्रमनिरास झाला आहे.

एक सामान्य कंडक्टर आता IAS होणार असल्याचे वाचल्यानंतर अनेकांना आनंद झाला मात्र तो कंडक्टर खोटं बोलल्याचे माहिती समोर आल्यानंतर वाचकांची निराशा झाली. मधूला खोटं बोलून काय साध्य करायचे होते असा प्रश्न आता विचारला जात आहे.

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.