परीक्षेचं टेन्शन येतंय ? नक्की काय करु ?

करिअरनामा । परीक्षा बिरीक्षा | परीक्षा मग ती शाळेतील असुदे किंवा आयुष्यातील संघर्षाची, कमी जास्त पातळीचा तणाव सोबत घेऊनच येते. परीक्षेचा ताण घेऊन आजारी पडणारे, आत्महत्या करणारे, उपाशी राहणारे आणि वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला त्रास करुन घेणारे विद्यार्थी आहेतच. दरवर्षी अशा त्रास झालेल्या विद्यार्थ्यांच्या घटना समोर आल्या की मन विदीर्ण होऊन जातं. अशा घटनांमधून सावरण्यासाठी करियरनामा घेऊन आलंय ‘मन फ्रेश करणाऱ्या काही ट्रिक्स’, या ट्रिक्स तुम्हाला तणावातून पूर्णपणे बाहेर काढतील अशी १००% खात्री देता येणार नाही, पण हा तुमचं टेन्शन पहिल्यापेक्षा थोडं नक्कीच कमी होईल एवढं मात्र खरं..

जीवनाचा महत्वाचा टप्पा म्हणून दहावी आणि बारावीची परीक्षा चर्चिली जाते. भयानक शिस्तीत घरातल्या सगळ्या लोकांनी परीक्षेची धास्ती घेतलेली असते. अनेक शाळांमधून या इयत्तेतील विद्यार्थ्यांना खेळात सहभागी होऊ दिलं जात नाही, ट्रिपला नेलं जात नाही. याशिवाय कुटुंबामध्ये काही बरं-वाईट घडलं तर त्याला/तिला त्रास नको म्हणून त्या प्रसंगात सहभागी करुन घेतलं जात नाही. पालकांच्या आणि शिक्षकांच्या विद्यार्थ्यांसोबत असलेल्या नात्यातून या शिस्तीची आणि गांभीर्याची तीव्रता बदलते. आता एवढं सगळं असताना विद्यार्थ्यांनी यातून बाहेर पडून निवांतपणे परीक्षेला कसं सामोरं जावं याचाही विचार व्हायला हवाच..

१) आपला अभ्यास झाला नाही, आपल्याला काही समजत नाही हा विचार पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका.

२) मार्क किती मिळवायचेत हे आधीच ठरवून मोकळं होऊ नका. जेवढा जास्त शक्य आहे तेवढा अभ्यास करुन परीक्षेला सामोरे जा.

३) तुम्हाला येणाऱ्या अडचणी मित्र-मैत्रिणी, शिक्षक आणि पालकांशी मनमोकळेपणाने बोला. कुठला दबाव वाटत असेल तर तुम्हाला समजून घेणाऱ्या जवळच्या व्यक्तीला त्याची कल्पना द्या.

४) दररोज किमान अर्धा तास स्वतःसाठी द्या. या वेळेत शांत बसून रहा किंवा एकटेच कुठेतरी फिरायला जा. आपल्याला नक्की काय करायचाय याचा विचार या वेळेत करायला हरकत नाही.

५) तुलनेच्या खेळात अडकू नका. प्रत्येकाची बुद्धिमत्ता आणि कौशल्य वेगवेगळी असतात. आपलं कौशल्य ओळखून त्यादृष्टीने पुढं जायचं डोक्यात घ्या.

६) कुणाच्या प्रेमात वगैरे असाल तर त्याचा अभ्यासावर परिणाम होणार नाही याकडं लक्ष असुद्या. ‘तुमच्या आहे तसं असण्यामुळे आणि जबाबदारीपूर्ण अभ्यासामुळे’ तुमच्यावर असलेलं समोरच्या व्यक्तीचं प्रेम वाढणारच आहे हे लक्षात घ्या.

७) स्वतःला लक्षात ठेवायला सोप्या जातील अशा नोट्स छोट्या डायरीमध्ये काढा, जेणेकरुन तुम्ही कुठेही गेलात तर फावल्या वेळात त्याचा उपयोग करुन घ्याल.

८) हलकफूलकं मनोरंजन म्हणून थ्री इडियट्स, तारे जमीन पर, मुन्नाभाई mbbs, लगे रहो मुन्नाभाई हे चित्रपट पहायला हरकत नाही. रोज पाहू नका एवढंच..!!

९) परीक्षाकाळात अतिरिक्त जागरण टाळा, चमचमीत खाण्यावर नियंत्रण ठेवा, सोशल मीडियावर जास्त वेळ घालवत असाल तर तो कमी करा आणि महत्वाचं ज्या गोष्टीची भीती वाटत आहे, त्याचा सामना करुन त्यावर काय उपाय काढता येईल याकडं लक्ष द्या.

बाकी अशा अनेक परीक्षा आहेत ज्या आपल्याला आयुष्यात खंबीर बनवणार आहेत, शिकवणार आहेत आणि हो त्यातूनच आपलं जगणं समृद्ध करणार आहेत. त्यामुळं लगे रहो..

काही अडचण असल्यास नक्की संपर्कात रहा..

तुमचाच..
आनंद
(9561190500)