विद्यार्थ्यांना दिलासा! राज्यातील १ली ते १२वीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात 25 टक्के कपात

मुंबई । सीबीएसईने 30 टक्के अभ्यासक्रम कमी केल्यानंतर आता राज्य शिक्षण मंडळाने सुद्धा कमी करावा अशी मागणी पालक, शिक्षकांकडून केली जात होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करत आता शिक्षण विभागानेही पहिली ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम 25 टक्के कपात करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. एकीकडे शाळा बंद आहेत, तरी शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू करण्यात आले. ऑनलाइन माध्यमातून हे शिक्षण देत असताना त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. त्यात अभ्यासक्रम पूर्ण कसा होईल, याबाबत प्रश्न विद्यार्थी शिक्षकांना पडलेला पाहायला मिळत होता.

आता अभ्यासक्रम कमी केल्याने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा नक्कीच मिळणार आहे. कारण दहावी आणि बारावी बोर्डाचा अभ्यास करताना अभ्यासक्रम लवकर संपवण्याचा प्रयत्न असतो. त्यात आता अभ्यासक्रम कमी केल्याने वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य होईल. अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

राज्यात आणि देशात कोरोनाचं संकट असताना देखील आपण शैक्षणिक वर्ष 2020-21 15 जून रोजी सुरु केलं. राज्यात प्रत्यक्ष सुरु करणे शक्य नसले, तरी विविध माध्यमातून शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. शाळा अद्याप सुरु न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात तणाव किंवा दडपण येऊ नये, यासाठी पहिली ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम कमी करण्याच्या निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे, असं राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”