अकरावीचे ऑनलाइन वर्ग आजपासून सुरू

करिअरनामा ऑनलाईन ।मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अकरावी प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. मात्र, या कालावधीत मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी प्रवेश नसला, तरी दहावी उत्तीर्ण असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अकरावीचे वर्ग ऑनलाइन सुरू होणार आहे.

करोनाकाळात शाळा बंद असल्या, तरी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. यामध्ये बालवर्ग ते दहावीपर्यंत आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. मात्र, नुकतेच दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया रखडल्याने मार्चपासून या विद्यार्थ्यांचा पारंपरिक शिक्षणाशी कोणताही संबंध राहिला नाही. यामुळे या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची ओरड पालक वर्ग करत होता. तसेच अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवणे घातक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदने प्रवेश नसला, तरी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे शिक्षण २ नोव्हेंबरपासून सुरू झाले आहेत . त्याचे सविस्तर वेळापत्रक आज विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. अशा प्रकारे प्रवेश न घेता विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे सर्वस्तरावरून याचे स्वागत होत आहे. या घोषणेनंतर पालक आणि विद्यार्थी यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

सुमारे सात महिने दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाशी संबंध आलेला नाही, त्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. अभ्यासक्रम चांगल्या दर्जाचा शिकविला जावा यासाठी राज्यातील ८० शिक्षकांची टीम तयार केली आहे. हे शिक्षक विद्यार्थ्यांला परिषदेच्या युट्युब वाहिनीवरून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहितीही पाटील यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांना हे लाइव्ह पाहता येणार नाही त्यांना या युट्युब चॅनेलवर नंतर पाहता येणार आहे, असेही ते म्हणाले.

अकरावी ऑनलाइन शिक्षणासाठी नाव नोंदणी करण्यासाठी – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com