भावी IAS अधिकार्यांसोबत मुख्यमंत्र्यांचा मसुरी येथे संवाद

मसुरी | अमित येवले

भावी प्रशासकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मसूरी येथे संवाद साधला. प्रशासनासमोर जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान हे नेहमीच सनदी अधिकारी यांच्यावर असते. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेची नाळ जनतेशी जोडण्यासाठी ‘नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून’ प्रयत्न करावे व त्याचप्रमाणे आज लोकशाहीचे चारही स्तंभ विश्वासार्हतेच्या कसोटीवर उतरण्यासाठी दररोज स्पर्धा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर संविधानाची भूमिका आणि त्यातून येणारे उत्तरदायित्त्व समजून घेऊन सर्वांच्या सहभागाने सनदी अधिकारी यांना काम करावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री यांनी केले.

उत्तराखंडमधील मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये ९३ व्या फाऊंडेशन कोर्समधील प्रशिक्षणार्थी आयएएस,आयपीएस आणि अन्य सेवांमधील अधिकारी तसेच मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्रामच्या चौथ्या फेजअंतर्गत प्रशिक्षणासाठी आलेल्या आयएएस अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी नागरी प्रशासन, शेती क्षेत्रातील बदल, आयात-निर्यात धोरण, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम आणि इतरही विषयांवर त्यांनी सविस्तर माहिती व अनेक उत्तरे यावेळी दिली.