कोरोनाने शिक्षणक्षेत्राला नव्या बदलाची संधी दिली आहे – अल्बर्ट प्रायन

Get real time updates directly on you device, subscribe now.

शिक्षणाच्या वाटेवर| कोरोना विषाणूमुळे जगभरातील सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद केली आहेत. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे  बंद असल्याने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नित्य जीवनात खंड पडला आहे. शिक्षणातील व्यत्यय आणि शिक्षण मंत्रालय यांच्यात बंद असलेला संपर्क यामुळे एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे जिने, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ, प्रशासक यांच्यासमोर एक अनपेक्षित आव्हान निर्माण केले आहे. परिस्थितीने नवीन सरासरी निर्माण केली आहे. या नव्या परिस्थितीशी कसे झुंजावे हा प्रश्न प्रत्येकजण विचारतो आहे. सामर्थ्य, दुर्बलता, संधी आणि धोका (SWOT Analysis) हे covid -१९ च्या परिस्थितीचे विश्लेषण करुन शिक्षणावर परिणामकारक काम करण्याची दिशा दाखवते. परिश्रमपूर्वक अभ्यास करणे हे उत्तम आहे. हा व्यायाम आपल्याला नवीन ध्येय आणि उद्दिष्टे निर्धारित करण्यास आणि त्यासोबत पुढे जाण्यास मदत करतील. 

सामर्थ्य – काही आठवड्यांपासून भारतातील शिक्षण संस्था बंद आहेत. पालक मुलांच्या शिक्षणाला घेऊन चिंतेत आहेत. काही पालक आपल्या मुलांना एखादा ऑनलाईन कोर्स करण्यासाठी जबरदस्ती करीत आहेत. पण विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोर्समध्ये रस नाही असं दिसत आहे. काही शैक्षणिक संस्थांनी शिक्षकांना ऑनलाईन साहित्य तयार करायला सांगितले आहे. पण शिक्षकांना ई-साहित्य तयार करण्याचा अनुभव नाही. काही महाविद्यालये आणि विद्यापीठे विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी ऑनलाईन वर्ग/ कोर्स घेऊ इच्छितात, पण त्यांना ते कशा पद्धतीने घ्यावेत ते माहित नाही. वरील परिस्थिती एक उदास चित्र वर्णन करते आहे पण तसे असता काम नये. का? या सगळ्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास, पहिल्यांदाच अनेक शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी शिक्षणाच्या उद्देशाचा विचार केला आहे, त्याच्याशी संबंधित आणि उपयुक्त असे प्रश्न विचारले जात आहेत. या अभूतपूर्व परिस्थितीने त्यांना गोष्टींकडे गंभीरपणे पाहण्यास शिकविले आहे. भविष्यात शिक्षणाची वेगळी व्याख्या असेल का? वेगळ्या पद्धतीने शिकण्याची गरज आहे का? संक्रमणाचा विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षणावर सकारत्मक परिणाम होईल की नकारात्मक?  विद्यार्थ्यांच्या ज्ञान आणि कौशल्यांचे मूल्यांकन कसे केले जाईल? आपल्या देशात जिथे लाखो विद्यार्थ्यांना संगणक खरेदी करणे शक्य नाही तिथे त्यांना इंटरनेट उपलब्ध होईल? ऑनलाईन शिक्षण इथे यशस्वी होईल? घरातील शिक्षणाचे काय महत्व आहे? शिकणाऱ्याची स्वायत्तता किती महत्वाची आहे? शिक्षकांवर अवलंबून राहणे आणि पारंपरिक मार्गाने शिक्षण हे चांगले आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या साथीच्या रोगाचा आपल्या शिक्षण प्रणालीवर सकारात्मक परिणाम झाला पाहिजे. परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा पूर्वीसारखीच स्थिती असता कामा नये. काहीतरी सकारात्मक बदल झाले पाहिजेत. 

दुर्बलता – नाविन्यपूर्ण विचारांचा अभाव, अपुऱ्या पायाभूत सुविधा, अप्रशिक्षित शिक्षक, असमान सुविधा, परीक्षाकेंद्री मूल्यांकन आणि शिकणाऱ्याच्या स्वायत्तत्तेचा अभाव हे घटक आपल्या शिक्षण प्रणालीतील कमकुवत घटक आहेत. हे घटक या साथीच्या काळात आणि संचारबंदीमध्ये कशाप्रकारे अडथळे बनत आहेत? दूरशिक्षण, दूरस्थ शिक्षण, गृहशिक्षण, ऑनलाईन शिक्षण, ई शिक्षण आणि वेबिनार हे आजकाल ऐकले जाणारे शब्द आहेत. दिल्ली सरकारने अलीकडे १२ वीचे वर्ग ऑनलाईन घेण्याची घोषणा केली. पण शिक्षकांनी ते अव्यवहार्य असल्याचे सांगितले, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांकडे त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. होय, आपल्याला पुढील प्रश्नांनी आव्हान दिले आहे. १) देशातील प्रत्येकाला ई शिक्षण परवडू शकेल? २) ऑनलाईन शिक्षण ही भारतातील उच्च्भ्रू संकल्पना आहे? ३) हे डिजिटल विभाजन भारतातील असमानता आणखी दृढ करुन देशात शैक्षणिक फूट पडेल? मोठ्या शहरातील आणि उच्च्भ्रू शाळांमध्ये असणारे शिक्षक अभिमानाने सांगतात की संचारबंदीमधील वेळेचा सदुपयोग करीत विद्यार्थ्यांच्या मदतीने ते ऑनलाईन शिकवत आहेत. गावातील, शहरातील सरकारी अनुदानित आणि सरकारी शाळांमध्ये  तसेच ग्रामीण भागातील खाजगी शिकवणाऱ्या शिक्षकांचे काय? तिथे ना शिक्षक ना विद्यार्थी. कुणाकडेच इंटरनेट सुविधा नाही. अगदी संगणकही  नाही. त्यांच्यामध्ये अशा हेतूसाठी ऑनलाईन शिक्षणाची साधने जसे की गुगल वर्गाची जागृती नाही आणि त्याबाबतचे कौशल्यही नाही. अशा शिक्षकांनी किमान असे वर्ग आयोजित करण्याचा विचार करण्याची तरी शक्यता आहे का? आपल्या शिक्षणप्रणालीने विद्यार्थी आणि शिक्षकांना सृजनशील पद्धतीने विचार करायला आणि अशा संकटकालीन स्थितीला व्यवस्थापित करायला शिकवले नाही आणि ई शिक्षणाला क्षुल्लक लेखले आहे. ते वर्गापासून ऑनलाईन पर्यंतच्या बदलासाठी तयारच नाहीत. 

हे पण वाचा -
1 of 9

संधी – प्रत्येक प्रणालीच्या काही कमकुवतता असतात तर काही सामर्थ्येही असतात. पुढे जाण्यासाठीची संधी न गमावता कमकुवतता कमी करून जास्तीत जास्त सामर्थ्य वाढविणे हे ध्येय असले पाहिजे. आपल्याकडे तीन महत्वाच्या संधी आहेत.
१) आपले विद्यार्थी जे Gen Z  शी संबंधित आहेत; २) असंख्य वेब संसाधने; ३) उत्साही शिक्षक. 
Gen Z शिकणारे (१९९७ ते २०१० मध्ये जन्माला आलेले.) खरे मूळ डिजिटल आहेत. त्यांचा जन्म डिजिटल युगात झाला आहे, ते लहानपणापासूनच  संगणक, बहुमाध्यम सामग्री आणि इंटरनेट आधारित क्रियांशी परिचित आहेत. जसे की ते ऑनलाईन वातावरणात राहतात, युट्युब व्हिडीओ पाहण्यात आनंद घेतात, लोकांशी सोशल मीडियावर जोडले जाणे त्यांना आवडते आणि ते तंत्रज्ञानाची भाषा बोलतात. त्यामुळे त्यांना थोड्या वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची गरज आहे. आता ई शिक्षणाची ओळख करून देण्यासाठी आणि शिकणाऱ्याची स्वायत्तता विकसित करण्यासाठी आपले वर्ग एका वेगळ्या व्यासपीठाकडे वळविण्याची हीच वेळ आहे. covid- १९ शिक्षकांना सृजनशील बनण्यास सक्षम करेल. ते आता युट्युब व्हिडीओ आणि पीपीटी सारखे ई साहित्य तयार करू शकतात आणि त्याच्या लिंक विद्यार्थ्यांसोबत सामायिक करून त्यांना या संचारबंदीच्या काळात व्यस्त ठेवू शकतात. काही शिक्षक झूम आणि ब्लु जीन्स सारख्या सुविधांचा वापर ऑनलाईन अध्यापनासाठी करून घेत आहेत. या सुविधांमध्ये ऑनलाईन वेळापत्रके, स्क्रीन सामायिकीकरण, भागीदारी, रेकॉर्डिंग यासारख्या आणि अनेक सुविधा आहेत. काही शिक्षक गुगल मीट वापरतात. गुगलची इतर संसाधने बघा जी दूरस्थ शिक्षणासाठी गुगल फॉर एजुकेशन टीचर सेंटर ऑनलाईन या साईटवर आहेत. 

धोके – डिजिटल शिक्षण लक्ष वेधून घेणाऱ्या देशांमध्ये भारत खूप मागे आहे. काही देशांमध्ये ई  शिक्षण प्रसिद्ध आहे, जिथे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात ऑनलाईन कोर्सेस (एमओओसी) सारख्या अनेक सुविधा सहज उपलब्ध होतात. ज्या तेथील शिक्षक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना त्यांची कौशल्ये विकसित करण्यास मदत करतात. ई शिक्षण शिकणाऱ्यांना स्वायत्तता देते आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांवर न अवलंबून राहता ज्ञान आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी सक्षम करते. भारताने अशा विकसित आणि विकसनशील देशांकडून धोका स्वीकारण्याची गरज आहे, जे गंभीररीत्या ई शिक्षणासाठी पुढाकार घेत आहेत आणि प्रामाणिकपणे त्याचा प्रसार करत आहेत. थोडक्यात शिक्षण सुरु राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिकत राहिले पाहिजे. संचारबंदीचा काळ उत्पादनात्मक झाला पाहिजे. शिक्षकांनी सृजनात्मक विचार केला पाहिजे आणि नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीची ओळख करून दिली पाहिजे. ज्या देशात इंटरनेट आणि हायस्पीड कनेक्टिव्हिटी समस्या आहे, डिजिटल विभाजन संकट आहे तिथे या आव्हानाला तोंड देण्याची गरज आहे. जे शिक्षण प्रशासन आणि नियोजनात काम करतात त्यांनी देशातील डिजिटल विभाजन कमी करण्याचा गंभीर विचार केला पाहिजे, देशातील ई शिक्षण अधिक लोकप्रिय केले पाहिजे. 

लेखक एक शैक्षणिक स्तंभलेखक, मुक्त प्रशिक्षक आणि लेखक आहेत. त्यांचा ईमेल आयडी – rayanal@yahoo.co.uk या लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला असून जयश्री या मुक्त पत्रकार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक – 9146041816

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: