शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत केंद्र सरकार म्हणते…

वृत्तसंस्था । देशात कोरोनाने शिरकाव केल्यांनतर देशातील राज्य आणि केंद्र सरकारनं सर्व शाळा, महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारनंही केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातंर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्था बंद करण्याचे आदेश दिले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्व शाळा, महाविद्यालयांसह अनेक परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान आता बंद करण्यात आलेली शाळा, महाविद्यालय सुरु करण्याबाबत एक महत्वाचं वृत्त केंद्र सरकारकडून मिळत आहे.

देशात सध्या लॉकडाउन असल्यानं शाळा महाविद्यालये बंद आहेत. येत्या १४ एप्रिलला २१ दिवसांचा लॉकडाउन संपणार आहे. मात्र, करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच शाळा महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच घेण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ‘पीटीआय’ला दिली आहे.

 

दरम्यान, भारतात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील करोना रुग्णांची संख्या रविवारी सायंकाळपर्यंत ३ हजार ५७७ वर पोहोचली होती. देशातील कोरोनाबाधितांचा वाढलेला आकडा चिंता वाढवणारा असून एकूण मृतांची संख्याही ८३ वर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकार शाळा, महाविद्यालयांबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.