साईट सुपरवायझर – बांधकाम क्षेत्रातील करिअर संधी

आज बांधकाम क्षेत्राचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. घर घेणे ही सर्वांसाठी महत्त्वाची गरज झाली आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात कामे करण्यासाठी अनेक लोकांची गरज पडत असते. अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत सर्वांचाच सहभाग या क्षेत्राला नेहमी लागत असतो. अशा सहभागी अनेकांपैकी एक म्हणजे ‘साईट सुपरवायझर’. बांधकाम क्षेत्रात सुपरवायझर व्यक्तीचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्याच्याशिवाय इमारतीचे काम पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे हल्ली या क्षेत्राकडे करिअर संधी म्हणून पाहिले जाते.

सिव्हिल इंजिनीअरिंग क्षेत्रात इमारतीच्या उभारणीपासून ते रस्ते, पूल, फ्लायओव्हर्स, स्कायवॉक, रेल्वे इत्यादींचा समावेश होत असतो. प्रत्यक्ष कामाच्या उभारणीसाठी ‘साइट सुपरवायझर’ची गरज असते. अनेक ज्युनिअर, सिनिअर इंजिनीअर्स, आर्किटेक्ट, डिझायनर्स, बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स व सप्लायर्स तसेच काम करून देणाऱ्या मजुरांमधील सुपरवायझर हा महत्त्वाचा दुवा मानला जातो. बांधकाम साहित्य कामाच्या ठिकाणी पोेहोचविण्यापर्यंतची सर्व कामे करून देण्याची जबाबदारी प्रत्येक साईटवरील सुपरवायझरची असते.
सर्वांत प्रथम काय काम करायचे आहे हे इंजिनीअर्सकडून समजावून घ्यावे लागते. त्यानुसार साहित्याची पूर्तता, लागणारे मजूर इत्यादींची जमवाजमव करून उभे राहून काम करून घेण्याची कला सुपरवायझरकडे असणे गरजेचे आहे. जी व्यक्ती योग्य पद्धतीने समन्वय साधू शकते, तीच व्यक्ती या साईट व्हिजन मानल्या गेलेल्या सुपरवायझरचे करिअर योग्य रीतीने पेलू शकते. स्वत: प्रात्यक्षिक केल्याने अनुभव वाढतो व आत्मविश्वास दांडगा होऊन भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होत राहते.

बिल्डिंग साईट सुपरवायझर म्हणून काम पाहण्यासाठी कमीतकमी दहावी-बारावी पास असणे आवश्यक आहे. तसेच बिल्डिंग मेन्टेनन्सचा कोर्स केला असेल तर उत्तमच. याचसोबत या व्यक्तीला कॉम्प्युटर, इंटरनेटचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे; कारण ती आजच्या काळाची गरज आहे.बिल्डिंग मेन्टेनन्स कोर्स केल्यानंतर बांधकाम क्षेत्रात अनुभवाने साईट सुपरवायझर होता येते. तसेच बिल्डिंग मेन्टेनन्सचा कोर्स करून प्रॅक्टिकल-थिअरी व प्रमाणपत्राची जोड मिळाल्याने या करिअरमध्ये भविष्य उज्ज्वल होण्यास मदत तर होतेच; पण पुढे काही वर्षांनी इमारतीच्या बांधकामाचे स्वतंत्र कॉन्ट्रॅक्ट घेऊन चांगला बिझनेस सुरू करता येतो. दहावी नापास व बारावी मुलांसाठी सुवर्णसंधी आहे. हल्ली साइटसाठी प्रशिक्षित सुपरवायझर मिळत नसल्याने बºयाच खासगी प्रशिक्षण केंद्रांत बिल्डिंग सुपरवायझर हा कोर्स सुरू केला असून तो दहावी व बारावी नापास विद्यार्थ्यांसाठी आहे, ही त्यांच्या दृष्टीने एक सुवर्णसंधी आहे. तसेच अशा कोर्समध्ये इमारतीचा पाया, आरसीसी काम, बांधकाम, प्लॅस्टर, प्लंबिंग, पेन्टिंग, टायलिंग, पीओपी इत्यादी अनेक कामांचा समावेश होत असतो. बिल्डिंग सुपरवायझर हा कोर्स खासगी तसेच सरकारी आयटीआयमध्ये शिकविला जातो. आजकालची परिस्थिती बघितल्यास साईटसाठी प्रशिक्षित सुपरवायझरची कमी जाणवत असल्याने बºयाच खासगी प्रशिक्षण केंद्रांत हा कोर्स सुरू केला आहे. हा कोर्स काही आठवड्यांपासून ते दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीपर्यंत शिकविला जातो. कोर्स पूर्ण केल्यानंतर कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी करता येते व पुढे जाऊन स्वतंत्र व्यवसाय सुरू करता येतो.