वास्तुकला : सर्जनशील करीयर संधी

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअर मंत्रा | आर्किटेक्चर म्हणजे वास्तुकला ही सर्व कलांची जननी मानली जाते. कारण मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक अशी ही कला असून त्यात प्रगती होत गेली. बंगले, अपार्टमेंट्स, दुकाने, ऑफिसेस, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, मंदिरे, बँका, इंडस्ट्रीज, कॉलनीज, बागा, वसतिगृहे, मॉल, मल्टिप्लेक्स, क्रीडा संकुल, विमानतळ, शोरूम्स या मानवनिर्मित स्थळांमध्ये या वास्तुकलेने मोठे चैतन्य भरले आहे. या वास्तुकलेमध्ये वास्तू सौंदर्य, हवा आणि प्रकाशाचा सुरेख संगम, अभिरुची, उपलब्ध साधनसामग्रीचा सुयोग्य वापर, मजबुती व टिकाऊपणा, सुसंबद्धता, पर्यावरणपूरकता, दळणवळण इत्यादी पैलूंचा अभ्यास करून मूर्त स्वरूप दिले जाते.

वास्तुकला ही कला आणि विज्ञान यांच्या संगमाने बहरत जाते. वास्तूंमध्ये कलात्मक चैतन्य भरण्याबरोबरच मजबूत बांधकाम शैली, सुयोग्य तंत्रज्ञान, साधनसामग्री अशा तांत्रिक बाबतीत असलेले नियोजनही वास्तुरचनाकाराकडून केले जाते. अशा प्रकाराच्या वास्तू निर्मितीतून वास्तुरचनाकारास उच्च प्रकाराचे मानसिक समाधान मिळत असते. त्याचबरोबर वापरकर्त्यांची धन्यवादाची पावतीही मिळत असते. फ्रँक लॉइड लाइट, वॉल्टर ग्रोपिअस, ला कार्बुझिए, मिज हँडर रोह, लुई कान्ह, लॉरी बेकर, चार्ल्स कोरिया यासह अनेक आर्किटेक्ट्स आपल्या प्रतिभासंपन्न वास्तू आाणि अवकाशनिर्मितीमुळे अजरामर झाले आहेत.

हे पण वाचा -
1 of 12

दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या , वाढत्या गरजा , वास्तू तथा अवकाशनिर्मितीबाबतची समाजातील वाढती जागरुकता यामुळे प्रतिभावंत आर्किटेक्ट्सची समाजातील गरज वाढतच चालली आहे. पण भारताची एकूण लोकसंख्या पाहता वास्तुकला क्षेत्रात कळकळीने काम करणारांची संख्या अतिशय कमी आहे. पण या क्षेत्रात करिअरच्या उत्तम अशा संधी आहेत. शिक्षणानंतर सुरुवातीच्या अनुभवानंतर वैयक्तिक अथवा भागीदाराबरोबर प्रॅक्टिस, चांगल्या फर्ममध्ये सेवा असे अनेक पर्याय आहेत. जगाच्या पाठीवर कोठेही शहर व खेड्यातही सेवेच्या संधी उपलब्ध आहेत.

आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम पाच वर्षांचा असतो. यात पहिली चार वर्षे शैक्षणिक व शेवटचे वर्ष प्रॅक्टिकल ट्रेनिंग असते. उत्तम वास्तू व अवकाश रचनेचे ज्ञान व्हावे यासाठी अभ्यासक्रमाची रचना असते. सौंदर्यशास्त्र, आरेखन, वास्तुकलेचा इतिहास, समकालीन वास्तुरचनाकार, बांधकाम कौशल्य, पर्यावरणशास्त्र, बांधकाम सामग्री, इंटेरिअर डिझाइन, लँडस्केप डिझाइन, नगर नियोजन अशा विषयांच्या आधारे अभ्यासक्रम पूर्ण होतो. शेवटच्या वर्षातील प्रॅक्टिकल ट्रेनिंगमुळे मिळालेल्या ज्ञानाचे व्यवहारातील प्रत्यक्ष उपयोग विद्यार्थ्यांना समजतात. तसेच शेवटच्या वर्षात यथायोग्य विद्यावेतनही दिले जाते. गणित विषयासह दहावी-बारावी किंवा तत्सम अभ्यासक्रम 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास आर्किटेक्चर साइडसाठी प्रवेश घेता येतो. मात्र अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट पास असणे बंधनकारक आहे. या परीक्षेद्वारे विद्यार्थ्याचा कल, वास्तुकलेविषयी त्याची अभिरुची तपासली जाते. अ‍ॅडमिशनच्या मेरिटसाठी दहावी आणि बारावीचे गुण, अ‍ॅप्टिट्यूड टेस्टचे गुण हे दोन्ही समप्रमाणात विचारात घेतले जातात. म्हणूनच सध्याच्या स्थितीत चांगल्या कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी बारावीबरोबरच अ‍ॅप्टिटयूड टेस्टमध्येही चांगले गुण मिळवणे महत्त्वाचे आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.